गेल्या काही दिवसांपासून राज्यातले एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या काही मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्याने राज्य सरकारने त्यापैकी काही मागण्या मान्यही केल्या. मात्र आता कर्मचाऱ्यांनी आपला राज्य सरकारमध्ये समावेश करुन घेण्यासंदर्भातली मागणी केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत अद्याप राज्य सरकारकडून काहीही ठोस आश्वासनं देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावण आहे. जर या आंदोलन अथवा संपात सहभागी झालेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई झाली तर कर्मचारी- कामगारांमधल्या असंतोषाचा उद्रेक होईल, असं राज ठाकरे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या भाजपा नेत्यांनीही लावून धरल्याचं चित्र आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कालच या विषयी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. अनिल परब यांची भेट घेतल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना अनिल परब यांचे आभार मानले. ते म्हणाले,”पगार व्यवस्थित होत आहे. त्यांच्या महागाई भत्ता, वेतन आणि इतर भत्त्यात वाढ केली आहे. मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपले वजन वापरून ही मागणी पुढे न्यावी, ही विनंती. पण कर्मचाऱ्यांची जी प्रमुख मागणी आहे ती मी एमडींकडे केली आहे की एसटीची विलिनीकरण सरकारमध्ये व्हावे”.
मला कर्मचाऱ्यांच्या व्यथांची जाणीव आहे. कर्मचारी व्यथित झाले तर परिस्थिती चिघळेल. कारवाईचे दिलेले आदेश मागे घेण्याची विनंती आपण मंत्र्यांकडे केल्याचंही दरेकरांनी सांगितलं.