Ashish Shelar on Yek Number Box Office Collection : गेल्या वर्षी १० ऑक्टोबर रोजी ‘येक नंबर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या प्रदर्शानच्या आधी अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांवर आधारित एक सिनेमा येणार असल्याच्या चर्चा रंगत होती. याबद्दल अनेकांमध्ये उत्सुकता होती. या चर्चेदरम्यान अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ‘येक नंबर’ चित्रपटाची घोषणा केली. यामध्ये अभिनेता धैर्य घोलपने प्रमुख भूमिका साकारली होती.

धैर्यचा ‘येक नंबर’ हा मुख्य अभिनेता म्हणून पहिलाच चित्रपट होता. तर, अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या सिनेमाची निर्मिती केली होती. या चित्रपटाच्या ( Yek Number) ट्रेलर लॉन्चिंगच्या कार्यक्रमाला स्वत: राज ठाकरे देखील उपस्थित होते. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची जितकी चर्चा होती ती चर्चा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ऐकायला मिळाली नाही. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यावर पहिल्या पाच दिवसांत ७२ लाख रुपयांची कमाई केल्याचा दावा इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने केला होता.

चित्रपटाने सुरुवातीच्या पाच दिवसांत ७२ लाख कमावले होते

या चित्रपटाचं नेमकं बजेट किती होतं किंवा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती रुपयांचा गल्ला जमवला याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी, अथवा चित्रपटाशी संबंधित लोकांनी कधीच कुठलीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही. मात्र, आता या चित्रपटाबाबत थेट विधीमंडळात चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.

‘येक नंबर’ची थेट विधीमंडळात चर्चा

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ‘येक नंबर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्याचं वक्तव्य केलं आहे. विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू असून आज या अधिवेशनाचा आठवा दिवस होता. आज विधान परिषदेत सांस्कृतिक कार्य विभाग व चित्रपटांविषयीच्या एका मुद्द्यावर बोलताना आशिष शेलार यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आधारित ‘येक नंबर’ चित्रपटाचा व शिवसेना-मनसेमधील संघर्षाच्या मुद्द्यावर कथित ‘झेंडा’ चित्रपटाचा उल्लेख केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मतदारांनी नाकारल्याचं सांगत आशिष शेलार म्हणाले, “राज ठाकरे यांचा चित्रपटही लोकांनी स्वीकारला नाही. या चित्रपटाचं बजेट तब्बल सात कोटी रुपये होतं. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने केवळ अडीच कोटी रुपये कमावले. मला ‘येक नंबर’वर टीका करायची नाही आणि यशस्वी राजकीय चित्रपटाचं गुणगाण देखील गायचं नाही.”