मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे ‘सेटिंग करून चिटींग करणारे नेते’ असल्याची खरमरीत टीका रिपाइं नेते खासदार रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे केली. एक दिवस टोलनाके फोडून आम्ही आंदोलने केली नाहीत. नामांतर ते शैक्षणिक आंदोलनांपर्यंत रिपाइंने आंदोलने केल्याचे सांगत आठवले यांनी राज यांना टीका करताना टवाळी करू नये, असा सल्ला दिला.जाहीर भाषणांमध्ये राज ठाकरे हे आठवले यांची नक्कल करीत टीका करतात. येथील पत्रकार बठकीत आठवले यांनी राज यांच्यावर टीका केली. केवळ इंदू मिलसाठीच नाही, तर रिपाइंने इतरही अनेक आंदोलने केल्याचे सांगत आठवले म्हणाले की, राजकीय टीका करावी, पण ती विनाकारण नसावी. युतीच्या उमेदवारांना पाडण्याचे मनसेचे प्रयत्न होते. मात्र, मनसेकडून कापली जाणारी मते रिपाइं भरून काढत असल्याने राज ठाकरे टीका करीत आहेत. केवळ एका दिवसात टोलनाके फोडून सेटिंग करून चिटींग करणारे आम्ही नेते नाहीत, असा टोला लगावताना या निवडणुकीत महायुतीला ३६ जागांवर विजय मिळेल, असा दावा त्यांनी केला.आता महायुतीत असल्याने महापालिकेतील सभापतिपद मिळावे. रिपाइं नगरसेवक सुरेश इंगळे यांना ते मिळावे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.