रत्नागिरी : माजी आमदार राजन साळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात होता. त्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चाही झाल्या होत्या. पक्षप्रवेशाची औपचारिकता फक्त बाकी होती. मात्र भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी राजन साळवी शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. किरण सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे साळवी अचानक शिंदे गटात का दाखल झाले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी साळवी यांना पक्षात घेऊन सामंतांच्या पक्षांतर्गत वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

रत्नागिरीत शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत राजन साळवी यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. जिल्हाप्रमुख पदापासून पक्षांतर्गत अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

पक्षनिष्ठेवर ठाम

एकनिष्ठ आणि कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी कधीच पक्षनिष्ठा ढळू दिली नव्हती. त्याचे फळही साळवी यांना मिळाले होते. सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून गेले होते.

शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २०२२ मध्ये झालेल्या उठावानंतरही त्यांनी आपली पक्षनिष्ठा ढळू दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतरही साळवी पक्षाशी एकनिष्ठ राहिले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत किरण सामंत यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पराभवाला माजी खासदार विनायक राऊत जबाबदार असल्याची तक्रार त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मात्र त्याची पक्षपातळीवर दखल घेतली गेली नाही. तेव्हापासून साळवी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.