मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला जाऊन मुंबईत परतले आहेत. मात्र त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून टीका होते आहे. राज्यात अवकाळी पाऊस झाला आहे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला मदत करायची सोडून मुख्यमंत्री देवदर्शन करत आहेत असं विरोधक म्हणत आहेत. यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एकनाथ शिंदे सरकारला खडे बोल सुनावले आहेत. एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे राजू शेट्टी यांनी?

बेमोसमी अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे महाराष्ट्रात कांदा, मुळा, भोपळा, द्राक्षं, पेरू त्याचबरोबर भाजीपाला यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. खरंतर तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतकरी आपलं पिक जपतो. पण निसर्गाच्या एका फटक्यामध्ये होत्याचं नव्हतं होतं. अशा अवस्थेमध्ये एकनाथांच्या राज्यामध्ये शेतकरी आज अनाथ झाला आहे.”

राज्याच्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका

“मुख्यमंत्रीसाहेब तुम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं असेल तर खुशाल घ्या ती तुमची व्यक्तीगत बाब आहे. परंतु राज्याच्या प्रमुखाला व्यक्तीगत गोष्टींपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. कर्तव्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. राज्याच्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका. ज्या प्रभू रामचंद्राचं दर्शन तुम्ही घेतलं, त्या प्रभू रामचंद्राने प्रजेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. त्यामुळेच जनता म्हणते की रामाचं राज्य आलं पाहिजे. तुमच्या राज्यात रामाचं राज्य निर्माण करायचं असेल तर अडचणीत आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या एवढीच कळकळीची विनंती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील तिसऱ्या अवकाळी पावसाने १४ जिल्ह्यातील २८ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यातील आठ हजार हेक्टर शेतातील उभ्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्याखालोखाल नगर जिल्ह्यात ७ हजार ३०५ हेक्टरवर नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.