स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या मंत्रिपदाला खुद्द खा. राजू शेट्टी यांचाच विरोध असल्याचे आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
शेट्टी हे एकीकडे मंत्रिपदाची मागणी करीत असले तरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे खोत यांच्यासाठी आग्रह धरीत नसल्याने त्यांना खोत यांना मंत्री करण्यात फारसे स्वारस्य दिसत नाही. शेट्टी बाहेर एक बोलतात आणि भाजप नेत्यांशी एक बोलतात. जनतेत भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पत ढासळली असून, शेतकरी उद्ध्वस्त होत असतानाही ही मंडळी गप्प आहेत याचे आश्चर्य वाटते.
राज्यातील मुख्यमंत्र्यांचा आणि भाजपचा चेहरा जनतेला आश्वासक आणि दिलासा देणारा वाटत नाही. सरकारच्या नाकत्रेपणामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. असे असतानाही शेट्टी मात्र भाजपच्या गळय़ात गळे घालून सत्तेसाठी फिरत आहेत असा आरोप आ. पाटील यांनी केला.