स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील आत्मक्लेश यात्रा राजभवनावर धडकत असतांना आज भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असलेले कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुणतांबे गाठुन राज्यस्तरीय धरणे धरुन बसलेल्या शेतकर्याना मुख्यमंत्र्यांशी चच्रेचे निमंत्रण दिले. दोघांच्या यात्रा व रस्ते वेगवेगळे असल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे.

आत्मक्लेश यात्रेपासून लक्ष विचलित करण्याकरिता शेतकरी संपाला फुस लावली. आता तडजोड घडविण्यासाठी मध्यस्थी करत असल्याच्या आरोपाचा खोत यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. खासदार शेट्टी यांच्याबद्दल मला आदर आहे. पण माझा रस्ता व्हाया गाव ते शेतकरी बांध असा आहे. मी बांधावर असून कोण कुठे आहे ते मला माहित नाही. पण मी शेतकरी यात्रेत आहे. पुणतांबे येथे राज्यस्तरीय धरणे धरुन बसलेल्या शेतकर्याना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चच्रेचे निमंत्रण घेवून आलो आहे. शेतकर्याच्या भेटीला सरकारचा प्रतिनिधी पहिल्यांदाच आला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सरकार बदलण्यासाठी प्रयत्न केले, नवे सरकार आले, त्यांना पाठींबा दिला पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकर्याकडे दुर्लक्ष केले. पाठींबा देवून चुक केली म्हणून आत्मक्लेश यात्रा काढत असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले असले तरी कृषी व पणन राज्यमंत्री खोत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तोंडभरुन स्तुती केली. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील व सुधाकर नाईक या तीन मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता फक्त देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांनी राज्यभर दौरा करुन शेतकर्याचे प्रश्न समजावून घेतले. त्यांच्याशी संवाद साधला. पूर्वी आंदोलने करुनही राज्यकत्रे ऐकुन घेत नव्हते. आता मात्र मुख्यमंत्र्यांनी पुणतांबे येथे मला पाठविले. हे प्रथमच घडले आहे असे ते म्हणाले.

गेल्या ३० वर्षांपासून मी चळवळ करीत आहे. कोण कसे कुठे चालले हे मला माहित नाही. पण आपण कसे हे मला माहित आहे. काहींना सदाभाऊंचे मंत्रीपद रुचलेले नाही. अनेकांना असुया आलेली आहे. त्यामुळे शेतकर्याचे नाव घेवून मगरीच्या प्रेमाने ते आश्रु ढाळत आहेत. मी कुणाचा दुस्वास करत नाही. मी हजारो शेतकर्यामधील एक कार्यकर्ता आहे. तो कार्यकर्ता राहण्यातच मला आनंद आहे. नियमनमुक्ती व निश्चलनीकरण यामुळे शेतकर्याना त्रास होतोय. पण चांगल्या गोष्टीसाठी हा त्रास सहन करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुणतांबे येथील ग्रामसभेत शेतकरी संपाचा निर्णय झाला. त्यानंतर संपासाठी किसानक्रांती या राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली. स्वाभिमानीचे खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेश यात्रा दि. २२ रोजी पुण्यातून निघाली. त्याच दिवशी पुणतांबे येथे समितीने बठक आयोजित केली होती. आज मुंबईत आत्मक्लेश यात्रेचा समारोप झाला. त्याचवेळी मंत्री खोत हे पुणतांब्याला आले. संपाला खोत यांची फुस असल्याचा आरोप केला जात होता. त्याचा आज त्यांनी चांगलाच समाचार घेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यावर टिकात्र सोडले. आंदोलन पेटविणे व विझविणे हा काँग्रेस वाल्यांचा धंदा आहे. विखे यांच्या मतदार संघात आल्यानंतर माझी शक्ती एवढी आहे याचा आनंद वाटायला लागला असा टोला त्यांनी विखे यांना लगावला.

शेतकरी चळवळीत काम करणारे अनिल धनवट, जयाजी सुर्यवंशी, योगेश रायते, शांताराम कुंजीर, संदीप गिड्डे यांचा माझा चळवळीत संबंध आला आहे. त्यांना त्यांच्या भुमिका आहेत. मी सरकारचे निमंत्रण घेवून आलो. मी कुणी जहागिरदार अथवा साखर सम्राट नाही. ऊसाचा चोथा खाऊन मोठा झालेला नाही. काळ्या आईची माती कपाळाला लावून घामाचे खाऊन मोठा झालो आहे. ऊसाचा चोथा खाणार्याची अवस्था चोथ्यासारखी झाली. गाईने व म्हशीने काँग्रेस खाल्ले म्हणजे बदामाच्या वासाचे दुध देत नाही. जैसा चारा वैसा सारा अशी टिका त्यांनी विखे यांचे नाव न घेता केली. शेतकरी संपात एका गटाची विखे यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांबरोबर बोलणी झाली होती. त्यांनी संप मागे घेतला होता. या गटाने खोत संप हायजॅक करत असल्याची आवई उठवून दिली होती. त्यामुळे खोत यांनी विखे यांना लक्ष केले.

समाज माध्यमांच्या माध्यमातून काही लोक माझी बदनामी करत होते. अनेक दिवस आम्ही एकत्र होतो. मी रस्त्यावरचा माणुस आहे. शेट्टी यांच्याबद्दल मला आदर आहे. पण संघटनेत नव्याने आलेले बदनामी करतात. पण आरोप – प्रत्यारोपात मला रस नाही. शेवटी कर्तुत्व श्रेष्ठ ठरविते. भाग्यरेषा व भविष्यावर माझा विश्वास नाही. कर्तुत्वावर मात्र निश्चित आहे. फुस लावण्याचा धंदा मी करत नाही. रस्त्यावरचा माणुस आहे. सरकारमध्ये प्रश्न सोडवायला मिळतात, त्यात वेळ जातो असे ते म्हणाले.

मंत्री खोत यांच्या दौऱ्यापासून शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दूर राहणे पसंत केले. विखे यांचे विरोधक व भाजपाचे डॉ. राजेंद्र पिपाडा व राष्ट्रीय समाज पक्षाचे कैलास कोळसे त्यांच्या सोबत होते. स्वाभिमानीचे चंद्रकांत उंडे यांनी त्यांची भेट घेवून प्रश्नांचा भडीमार केला. खोत यांनी मात्र न चिडता त्यांचे म्हणने ऐकुन घेतले.

  • नवे सरकार आले, त्यांना पाठिंबा दिला पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकर्याकडे दुर्लक्ष केले. पाठिंबा देऊन चूक केली म्हणूान आत्मक्लेश यात्रा काढत असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले होते.
  • राज्यमंत्री खोत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तोंडभरुन स्तुती केली. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील व सुधाकर नाईक या तीन मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता फक्त देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजूत घेतल्याचे खोत म्हणाले.
  • समाज माध्यमांच्या माध्यमातून काही लोक माझी बदनामी करत होते. अनेक दिवस आम्ही एकत्र होतो. मी रस्त्यावरचा माणूस आहे. शेट्टी यांच्याबद्दल मला आदर आहे. असे खोत यांनी स्पष्ट केले.