scorecardresearch

कोल्हापूर : महावितरणाचं कार्यालय शेतकरी संघटनेनं पेटवलं; सरकारला इशारा देत म्हणाले, “शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष…”

आज दिवसभरात राज्यामध्ये महावितरणाविरोधातील आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे.

Kolhapur Protest
मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयाला लावली आग

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये महावितरण कार्यालयासमोर मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतून अज्ञात शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयाला आग लावल्याची घटना घडलीय. मध्यरात्रीच्या सुमारास संतप्त अज्ञात शेतक-यांनी कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवले.

कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयामध्ये आग लागल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक यंत्रणेची मदत घेत आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीमध्ये काही कागदपत्रं जळून खाक झाल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान आज दिवसभरात राज्यामध्ये महावितरणाविरोधातील आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे. “शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढणार असल्याचा संघटनेकडून इशारा,” अशं ट्विटही संघटनेच्या ट्विटर हॅण्डलवरुन हा आग लावल्याचा व्हिडीओ पोस्ट करत देण्यात आलाय.

दरम्यान, कालच राजू शेट्टींनी या आंदोलनादरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना तुडवू, असा इशारा दिला आहे. जनतेला लुबाडायचे आणि त्यांच्या घरावर दरोडे घालायचे बंद करा असंही शेट्टी सरकारवर टीका करताना म्हणालेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतीला सलग दहा तास दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी केलीय. या मागणीसाठी बुधवारी (२३ फेब्रुवारी) सलग दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरमधील महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकरी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं. राजू शेट्टींसह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. 

नक्की वाचा >> “…तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही तुडवू”, राजू शेट्टींकडून कोल्हापुरात नितीन राऊतांचा पुतळा जाळत इशारा

“महावितरणच्या वीज निर्मितीमध्ये साखर कारखान्यापेक्षाही मोठा घोटाळा आहे. तो लवकरच चव्हाट्यावर आणू. कंपनीमध्ये मंत्र्यांचे लागेबांधे आहेत. जनतेच्या पैशाची महाविकास आघाडी सरकारकडून लूट सुरू आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे करत असेल, तर मंत्र्यांनाही तुडवू. जनतेला लुबाडायचे, त्यांच्या घरावर दरोडे घालायचे धंदे बंद करावे,” असा इशारा शेट्टींनी महाविकास आघाडीला दिलाय.

“विजेचा धक्का लागून हत्ती मारला गेला, तर नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांकडून २५ कोटी रुपयांची वसुली केली जाते. शेतकऱ्याला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला तर केवळ २ लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते. माणसापेक्षा जंगली प्राण्यांची किंमत जास्त आहे. या तीन कुबड्याच्या सरकारने शेतकऱ्यालाच अस्थिर केले आहे. सरकारमधील मंत्र्यांना सत्तेची मस्ती आली आहे. सत्तेच्या धुंदीत जनता तुम्हाला रस्त्यावर आणेल,” असंही शेट्टी सरकारवर निशाणा साधताना म्हणालेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raju shetty shetkari sanghatana protest against mahavitaran set office on fire scsg