स्वत:चा टीआरपी व मार्केटिंग वाढविण्यासाठी खासदार राजू शेट्टी हे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल भलतीसलती विधाने करत आहेत. त्यांचा उठवळपणा थांबला नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जशास तसे उत्तर देऊन त्यांना सळो की पळो करून सोडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष माजी खासदार निवेदिता माने यांनी इचलकरंजी येथे दिला. या वेळी सर्वच वक्त्यांनी खासदार राजू शेट्टी यांना टीकेचे लक्ष्य केले.
माने म्हणाल्या, पवार यांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम शेट्टी राबवत आहेत. शेतकऱ्यांना दर परवडत असेल तर त्यामध्ये अडथळा आणण्याचे काम त्यांनी करू नये. ऊसदराच्या आंदोलनात २ हजार ५०० रुपयांच्या उचलीवर तडजोड झाली तर राजू शेट्टी यांच्या व्यवहारात ‘डाल में कुछ काला है’ संशय येण्यास जागा आहे. शेट्टी यांनी सुप्रिया सुळे व माझ्यासारख्या महिलेवर खालच्या पातळीवर येऊन टीका चालवलेली आहे. युती काँग्रेसच्या मधमाश्यांचा डंक त्यांना बसला तर पळता भुई थोडी होईल, असा इशारा त्यांनी दिला.     
पुतळा जाळल्यावरून वाद
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजू शेट्टी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याच्या प्रकारावरून शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर पोलीस व कार्यकर्त्यांत वाद झाला. पक्ष कार्यालयासमोरील कार्यक्रम संपल्यानंतर निवेदिता माने, अशोक जांभळे यांच्यासह प्रमुख नेते निघून गेले होते. काही उत्साही कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावर जाऊन खासदार शेट्टी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला, ही माहिती समजल्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षकघटनास्थळी दाखल झाले. जमावबंदी आदेश असताना पुतळा जाळल्याबद्दल त्यांनी शहराध्यक्ष मदन कारंडे यांना जाब विचारला. कारंडे यांनी असा प्रकार घडला नसल्याचा खुलासा केला. त्यावर पवार यांनी कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केल्याने वादावादी होत राहिली.