भाजपाकडे असलेल्या ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या तीन अतिशय प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच राज्य सरकार पाडण्याच्या उलथापालथी होत आहेत. असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपावर टीका केली आहे.

राजू शेट्टी म्हणाले, “ भाजपा ज्या पद्धतीने पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील सरकार पाडतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे. महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही. कारण आम्ही दोन महिन्यांपूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेले नाही हे स्पष्ट झाल आहे.”

तेव्हा वेळीच काळाची पावले ओळखा –

तसेच, “ ज्या पक्षाचे नाव घेऊन निवडून येतात आणि नंतर त्या पक्षालाच विसरतात ही प्रवृत्ती वेगाने वाढतेय आणि देशांमध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव आहे. आज उद्या भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षावर सुद्धा अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा वेळीच काळाची पावले ओळखा.” असंही राजू शेट्टींनी बोलून दाखवलं.