५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पध्रेत यावर्षी प्रथमच चंद्रपूर केंद्रावर अतिशय दर्जेदार ११ नाटकांचे सादरीकरण झाले. आशय, विषय, सादरीकरण, नेपथ्य, संगीत आणि अभिनय अशा सर्वच आघाडय़ांवर अतिशय सरस राहिलेल्या या नाटकांमुळे ही स्पर्धा अतिशय चुरशीची झाली आहे.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य महासंचालनालयामार्फत आयोजित या नाटय़ स्पध्रेला १९ नोव्हेंबरपासून येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात सुरुवात झाली. १९ नोव्हेंबरला अविष्कार यवतमाळ या संस्थेचे गिरीश जोशी लिखित व जयंत कर्णिक दिग्दर्शित ‘फायनल ड्राप्ट’ हे दोन अंकी नाटक सादर झाले. काहीतरी चांगले करण्याच्या विचारांनी ग्रासलेली, पण नेमके काय करायचे हे माहिती नसल्याने विचारांचा गोंधळ मनात घेऊन पुण्यात आलेल्या तरुणीची ही कथा आहे. या नाटकाचा विषय चांगला होता, परंतु सादरीकरण, नेपथ्य, संगीत व अभिनयाच्या बाबतीत हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले नाही. २० नोव्हेंबरला ‘कोण म्हणतं टक्का दिला’ हे संजय पवार लिखित नाटक वर्धा व यवतमाळ येथील दोन संस्थांनी सादर केले. सवर्णाच्या घरी एका दलित व्यक्तीने मुक्काम केल्यानंतर उद्भवलेले कौटुंबिक मतभेद यात दाखविण्यात आले आहेत. या नाटकाचा विषय दर्जेदार असला तरी तांत्रिकदृष्टय़ा कमकुवत राहिल्याने हे नाटक काहीसे ढिसाळ पद्धतीने सादर झाले. २१ नोव्हेंबरला ‘राहिले दूर घर माझे’ या शफाअत खान लिखित नाटकात भारत-पाकिस्तान या दोन देशांची फाळणी झाल्यानंतर हिंदू व मुस्लीम कुटुंबाच्या आयुष्यात उद्भवलेला संघर्ष दाखविला आहे. अभिनय, नाटय़ाला साजेसे संगीत व नेपथ्यामुळे या नाटकाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. २३ नोव्हेंबरला अनिल सोनार लिखित कामगार मनोरंजन केंद्र चंद्रपूर तर्फे ‘प्रतिकार’ हे नाटक सादर झाले. एक पोलीस अधिकारी, त्याने तरुणपणी युवतीवर केलेला बलात्कार, बदला घेण्याच्या भावनेने पेटून उठलेले मुलीचे वडील व पोलीस अधिकाऱ्याची पत्नी या चार प्रमुख पात्रांभोवती हे नाटक फिरते. सुंदर नेपथ्य, पोलीस अधिकारी व पत्नीच्या उत्कृष्ट अभिनयामुळे हे नाटक प्रेक्षकांच्या लक्षात राहिले.
यानंतर २७ नोव्हेंबरला नवोदिता या संस्थेने प्रा.जयश्री कापसे गावंडे, अजय धवने व आशिष अंबाडे निर्मित, प्रशांत दळवी लिखित ‘ध्यानीमनी’ हे नाटक सादर केले. सदानंद पाठक आणि शालन पाठक या दाम्पत्याच्या आयुष्यात मूल नसल्यामुळे मोठी पोकळी आहे. निपुत्रिक शालन आपल्याला एक मूल आहे, या भासात मोहीत नावाचा काल्पनिक मुलगा वाढविते. या मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी चाललेली खाटाटोप याभोवती या नाटकाची कथा फिरते. अभिनेत्री नूतन धवने, गायत्री देशपांडे व प्रसाद ढाकुलकर यांचा कसदार अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापराच्या बळावर या नाटकाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले. कलाश्रय ज्ञान व कला संवर्धन यवतमाळ या संस्थेने २८ नोव्हेंबरला प्रशांत दळवी लिखित ‘सेलिब्रेशन’ हे नाटक सादर केले. विभक्त कुटुंबाला एकत्र आणण्याच्या ध्यासापोटी पतीच्या मृत्यूला लपवून वाढदिवस साजरा करणे अर्थात, सेलिब्रेशन हा विषय होता. मात्र, या नाटकाची कथा प्रेक्षकांच्या बुद्धीला पटत नसल्यामुळे हे नाटक हास्यास्पद ठरले. सुमार अभिनय, अवास्तव विषय, चुकीचे संवाद यामुळे ते प्रेक्षकांना भावले नाही. ३० नोव्हेंबरला श्री राजे बहु.संस्था यवतमाळने ‘लग्न नको पण पप्पा आवर’ हे नाटक सादर झाले. पुरुषी व्यभिचारी वृत्ती हा या नाटकाचा विषय होता. विनोद व सवंग मनोरंजनाचे उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहिले गेले. १ डिसेंबरला तेजांकूर बहु.संस्था यवतमाळने पुनीत मानकर लिखित व अपूर्वा सोनार दिग्दर्शित ‘ग्रीष्मदाह’ हे नाटक सादर केले. स्त्री अत्याचार व त्यातून महिलांची होणारी होरपळ आणि प्रतिकार हा नाटकाचा विषय होता. वास्तववादी कथानक, वेगवान घडामोडी, उत्कृष्ट संवाद लेखन, हृदयस्पर्शी कथानकामुळे ते प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले. अभिनय, नेपथ्य, संगीत आणि कथेत पात्रांची साजेशी गुंफण यामुळे हे नाटक विशेष उंची गाठणारे ठरले. या नाटकातील जि.प.सभापतीची भूमिका साकारणारा सूर्यकांत घाडगे यांचा अभिनय प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. ‘वाटा पळवाटा’ व ‘४७ एके ४७’ या नाटकांचे सादरीकरण जेमतेम झाले. स्पध्रेतील ११ पैकी ८ नाटके यवतमाळ, २ चंद्रपूर व १ वध्रेचे संस्थेने सादर केले. काल, १ डिसेंबरला या स्पध्रेचा समारोप झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya natya spardha
First published on: 03-12-2014 at 07:29 IST