राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आज सकाळी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोन्ही बाजूंनी एकमेकांना यासंदर्भातले प्रस्ताव दिले होते. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मात्र, तोपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रस्ताव स्वीकारल्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक होणार असल्याचं निश्चित झालं आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

“महाविकास आघाडीचे नेते, देवेंद्र फडणवीस आणि मी अशी आमची तासभर चर्चा झाली. राज्यसभेची तिसरी जागा मागे घेण्याच्या बदल्यात विधान परिषदेची एक जागा जास्त देण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीचा होता. त्याबदल्यात आम्ही त्यांना प्रस्ताव दिला की तुम्ही राज्यसभेसाठीची दुसरी जागा मागे घ्या आणि मग विधानपरिषदेची पाचवी जागा आम्ही लढवणार नाही. त्यानंतर आमचा कोणताही संवाद झाला नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“साडेअकरा वाजल्यानंतर कुणीच काही बोललं नाही. आता तीन वाजून गेले आहेत. त्यामुळे निवडणूक आता अटळ आहे. भाजपा ती तिसरी जागा १०० टक्के जिंकेल”, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

संख्याबळ कसं जमवणार?

“पुरेसं संख्यबळ त्यांच्याकडेही नाही. कॉमन मतांसाठी दोघेही प्रयत्न करतील. आमच्याकडे ३० आहेत. ४१.०१ असा कोटा आलाय. अतिरिक्त १२ मतं आमच्याकडे आहेत. प्रेफरन्शियल वोटिंग आहे. यात असे इतिहासातले अनेक दाखले आहेत की पहिल्या क्रमांकाची मतं कुणाकडे तरी जास्त आणि कुणाकडे तरी कमी होती. कमी मतं असलेला उमेदवारही जिंकून आला आहे. कारण या पद्धतीत एका मताचा एक दशांश इथपर्यंत मोजण्याची पद्धत आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक जिंकणार याबद्दल खात्री आहे”, असं पाटील यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“इतर पक्षाच्या आमदारांशी आम्ही संपर्कात नाही”

“आमचा सगळ्यंशी संपर्क झालेला आहे. त्यामुळे वेगळी बैठक बोलावण्याची गरज नाही. प्रत्येकाशी आमचं बोलणं सुरू आहे. इतर पक्षाच्या उमेदवारांशी आम्ही संपर्कात नाही. ती आमची कार्यपद्धतीही नाही. त्याचा उपयोग नाही. प्रस्थापित पक्षाच्या आमदाराला त्याच्या प्रतोदाला ते मत दाखवावं लागतं. त्यामुळे अधिकृत मतांच्या व्यतिरिक्तच्या मतांवर सगळं गणित चालेल”, असं देखील पाटील यांनी यावेळी नमूद केलं.