जोशी (भटके) समाज जात पंचायतीच्या धक्कादायक निर्णयांमुळे अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले असून या पंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी आंतरजातीय व मिश्र विवाह चळवळ संघटनेतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अनेक कुटुंबांना वेठीस धरणाऱ्या पंचायतीच्या पंचांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. जोशी (भटके) समाज जात पंचायतीच्या धक्कादायक निर्णयांचा घटनाक्रम नुकताच उघड झाला. समाजातील कोणी आंतरजातीय विवाह केल्यास संपूर्ण कुटुंबास बहिष्कृत करण्याच्या निर्णयाचे चटके अनेक कुटुंबे सहन करत आहेत. मागील आठवडय़ात गर्भवती मुलीचा वडिलांनी गळा दाबून खून करण्याची घटना घडली होती. त्याचेही मूळ जात पंचायतीमध्ये असल्याचे आंतरजातीय व मिश्र विवाह चळवळीचे राजू देसले व महेंद्र दातरंगे यांनी म्हटले आहे. या घटनाक्रमाच्या पाश्र्वभूमीवर, संघटनेच्या वतीने शनिवारी जातविरोधी प्रबोधन मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चात जात पंचायतीने बहिष्कृत केलेली पीडित कुटुंबेही सहभागी झाली होती. आंदोलकांनी जात पंचायतीच्या कार्यशैलीचा निषेध केला. जात पंचायतीच्या निर्णयाचे चटके सोसणाऱ्या अनेक कुटुंबांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पंचायतीचे अध्यक्ष भास्कर शिंदे याच्यासह भीमराव गंगाधर धुमाळ, रामदास बापू धुमाळ, मधुकर बाबूराव कुंभारकर, एकनाथ निळूभाऊ शिंदे, शिवाजी राजू कुंभारकर या पंचांनाही अटक केली आहे. शासनाने या प्रकरणातील सर्व संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2013 रोजी प्रकाशित
जात पंचायतीच्या विरोधात मोर्चा
जोशी (भटके) समाज जात पंचायतीच्या धक्कादायक निर्णयांमुळे अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले असून या पंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी आंतरजातीय व मिश्र विवाह चळवळ संघटनेतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अनेक कुटुंबांना वेठीस धरणाऱ्या पंचायतीच्या पंचांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

First published on: 07-07-2013 at 02:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally against caste panchayat in nashik