रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले केवळ पदासाठी व सत्तेसाठी महायुतीत सहभागी झाले आहेत, भीमशक्तीचा हा दुरुपयोगच आहे. मातंग समाज आपसातील अंतर्गत वाद बाजूला ठेवून एकसंघपणे काँग्रेस आघाडीमागे उभा राहील, आघाडीला आठवलेंची उणीव भासू देणार नाही, मातंग समाज आठवलेंचा भ्रमही दूर करेल, असे प्रतिपादन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी केले.
कदम यांनी नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी मातंग समाजाचा मेळावा घेतला. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. नगरप्रमाणेच राज्यातील १७ मतदारसंघांत मातंग समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. या सर्व ठिकाणी आपण समाजाचे मेळावे घेणार आहोत. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात नगरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरला समाजाचा मेळावा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राष्ट्रवादीकडून लक्ष्मणराव ढोबळेंवर अन्याय झालेला नाही, उलट पक्षाने त्यांना भरपूर दिले आहे. ढोबळेंचे मंत्रिपद सोलापूर जिल्हय़ातील राजकारणाचा बळी ठरल्याने गेले, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मातंग समाज परंपरागत काँग्रेसच्या मागे होता, परंतु समाजाला स्वतंत्र ओळख मिळाली नाही, त्यामुळे समाज आता राष्ट्रवादीसमवेत आहे. राष्ट्रवादीकडून समाजाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. काही प्रश्न सुटले आहेत, काही प्रलंबित आहेत, परंतु आता ही वेळ संघर्षांची नाही. राष्ट्रवादीमागे संघटित ताकद उभारून नंतर पुन्हा प्रश्नांसाठी संघर्ष केला जाईल, असे कदम यांनी सांगितले.
या वेळी सुनील उमाप, दिलीप सरोदे, अशोक रोकडे, शंकर भारस्कर, अंकुश मोहिते, विजय शेलार, संतोष जगधने आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athavale has only participated for the post and the power in alliance kadam
First published on: 24-03-2014 at 03:35 IST