scorecardresearch

“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप

शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप
रामदास कदम, मनोहर जोशी व उद्धव ठाकरे

शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “उद्धव ठाकरे कोणी मोठं व्हायला लागलं की त्याचे पंख छाटतात. मनोहर जोशी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी समोरच्या घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना शांत केलं नाही,” असा आरोप रामदास कदम यांनी केला. यावेळी त्यांनी प्रमोद नवलकर यांचंही उदाहरण दिलं. तसेच नवलकरांच्या मुलीला विचारा त्यांनी उद्धव ठाकरेंना कशी वागणूक दिली, असंही म्हटलं. ते शुक्रवारी (७ ऑक्टोबर) एबीपी माझाशी बोलत होते.

रामदास कदम म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी दसऱ्याला शिवाजी पार्कवर जे भाषण केलं तिथं त्यांनी भाषणाचा दर्जा इतका खाली आणला की, एकनाथ शिंदेंचा नातू फक्त दीड वर्षाचा असताना त्यालाही त्यांनी सोडलं नाही. उद्धव ठाकरे इतके खाली येऊ शकतात, भाषणाचा दर्जा इतका खाली येऊ शकतो आणि ते इतक्या खालच्या स्तरावर येऊन विचार करू शकतात हे महाराष्ट्राला पुन्हा एकदा कळलं आहे.”

“पक्षात थोडं जरी कोणी मोठं झालं तरी उद्धव ठाकरेंनी त्याचे पंख छाटले”

“पक्षात थोडं जरी कोणी मोठं झालं तरी उद्धव ठाकरेंनी त्याचे पंख छाटले आहेत, संपवलं आहे. याच शिवाजी पार्कच्या मैदानावरील स्टेजवर मनोहर जोशी आले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पायाला हात लावला होता, पाया पडले. मनोहर जोशींचं वय किती आणि उद्धव ठाकरेंचं वय किती? समोर असणाऱ्या माणसांना घोषणा द्यायला सांगून मनोहर जोशींना जायला भाग पाडण्यात आलं,” असा आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

“नेत्याला संपवून टाकायचं हाच विचार केला”

“तेव्हा उद्धव ठाकरे उठून सर्वांना शांत बसा म्हटले असते तर काहीही झालं नसतं. मात्र, नेत्याला संपवून टाकायचं हाच विचार केला गेला,” असंही कदमांनी नमूद केलं.

हेही वाचा : Dasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट

“नवलकरांच्या मुलीला त्यांनी उद्धव ठाकरेंना कशी वागणूक दिली”

ते पुढे म्हणाले, “नवलकरांच्या बाबतीत असंच झालं होतं. प्रमोद नवलकरांचे फोन घेतले नाही, भेटही दिली नव्हती. आजही नवलकरांच्या मुलीला जाऊन विचारा की, जेव्हा नवलकरांचं निधन झालं तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या नवलकरांच्या पत्नीने उद्धव ठाकरे आल्यावर त्यांना काय वागणूक दिली होती.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या