मी आज राष्ट्रवादीतच आहे, उद्याचं उद्या पाहू असं म्हणत रामराजे निंबाळकर यांनी स्वतःच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांबाबत काहीसा संभ्रम निर्माण केला आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत हाती कमळ घेण्याचा म्हणजेच भाजपात जाण्याचा निर्णय नक्की केला आहे. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिवसेना प्रवेश करणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण केला आहे.

काय म्हणाले आहेत रामराजे नाईक निंबाळकर?

“मी आज तरी राष्ट्रवादीतच आहे, उद्याचं उद्या पाहू. या वयात शरद पवारांची साथ सोडावी असं वाटत नाही. मी कार्यकर्ता मेळावा बोलावला आहे तो पक्षातून बाहेर पडण्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी बोलवला आहे. कार्यकर्ते कदाचित असाही निर्णय घेऊ शकतात की आपण आहोत तिथेच राहू. कदाचित ते ठरवू शकतात की आपण अपक्ष लढू. स्वार्थासाठी कोणताही निर्णय घेणार नाही. मात्र कार्यकर्ते ठरवतील त्या दिशेने जाणार असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर मी उद्या काय करणार? हे आज सांगणं थोडं ‘प्रीमॅच्युअर’ होईल. राजकारणात कठोर निर्णय घ्यावे लागतात तसा निर्णय घेण्याची वेळ माझ्यावर येऊ नये इतकंच वाटतं” असंही रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक धक्के बसत आहेत. अनेक दिग्गज राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेनेत जात आहेत. अशात रामराजे निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन शिवसेनेत जाणार या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. मात्र आता रामराजे निंबाळकर यांनी या चर्चा पुढे सुरु रहाव्यात अशीच व्यवस्था त्यांच्या वक्तव्यातून केली आहे. “ज्यांना आम्ही लाल दिवा दिला अशी माणसंही राष्ट्रवादी सोडून जात आहेत” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. त्याबाबत रामराजे निंबाळकर यांना विचारलं असता, “हे वक्तव्य त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत केलं आहे. मी आज तरी राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे ही टीका मला उद्देशून त्यांनी केली होती असं म्हणता येणार नाही” असं उत्तर दिलं आहे.