मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीचे आरोप असलेल्या तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर, विनोद गंगणे व इतरांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांना भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या आरोपींना भाजपमध्ये प्रवेश न देण्याचीही विनंती केली होती. पाटील यांच्या पुढाकाराने या पदाधिकाऱ्यांचा काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश झाल्यापासून सुळे यांनी आरोपांच्या फैरी डागल्या होत्या. त्यावर पाटील यांनी पत्र लिहून सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे. परमेश्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) तुळजापूरमधील नेते होते आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे आरोप झाल्यावर त्यांना पक्षातून काढूनही टाकण्यात आले नव्हते.
वास्तविक पोलिस अधीक्षकांशी मी याप्रकरणी चर्चा केली होती. गंगणे यांनी पोलिसांना या तस्करीची माहिती दिल्यावर त्यांनाच आरोपी करण्यात आले होते. पण जोपर्यंत एखाद्यावर आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत तो निरपराधच असतो, त्याला गुन्हेगार मानले जात नाही, या संविधानातील तरतुदीनुसार बहुधा तुमच्या पक्षाने परमेश्वर यांना पक्षातून काढले नव्हते. त्याचबरोबर याच तत्वानुसार एका मंत्र्यावर गंभीर आरोप झाल्यावरही मंत्रिमंडळातून काढले नव्हते, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
मात्र तरीही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे किंवा कदाचित राजकीय अपरिहार्यतेतून आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल सलग जाहीरपणे वक्तव्ये करीत आहात. याप्रकरणी वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी, प्रसिद्धीमाध्यमांमधून आरोपांच्या फैरी झाडत (‘ मीडीया ट्रायल ’) बसू नये, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शताब्दी रुग्णालयासंदर्भातही पाटील यांच्या तेरणा ट्रस्टवर आरोप करण्यात आले आहेत.
त्यालाही पाटील यांनी उत्तर दिले आहे. मुंबईतील शताब्दी रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेत तेरणा ट्रस्टने केवळ सहभाग घेतला आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र कोणीही सहभागी झाले नाही. तिसऱ्यांदा निविदा निघाल्यानंतर तेरणा ट्रस्टने त्यात सहभाग घेतला, यात नेमके चुकीचं काय झाले आहे? हे जर आपण सांगू शकलात, तर बरे होईल, असे पाटील यांनी सुळे यांना लिहीलेल्या पत्रात नमूद केले आहे.
