‘वायू’ वादळामुळे मान्सूनच्या पावसाचे राज्यातील आगमन काही दिवसांनी लांबणीवर पडले आहे. देशाचा ४२ टक्क्यांहून अधिक भागामध्ये कोरड पडली असून तेथे अती ते मध्यम स्वरुपाचा दुष्काळ पडला आहे. मागील वर्षांपेक्षा दुष्काळाची टक्केवारी ६ टक्क्यांनी अधिक आहे. महाराष्ट्राच्या ५० टक्के भूभागावर दुष्काळाचा झळा सोसाव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे. मात्र अशाच दुष्काळग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी अभिनेता रणदीप हुडा पुढे सरसावला आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी ‘खालसा एड’ या शीख समुदायाच्या संघटनेने पुढाकार घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या या संघटनेने महाराष्ट्रातील दुर्गम भागातील गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील वेळे गावामध्ये या संघटनेने पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवले. यावेळी अभिनेता रणदीप हुडाही या पाणी वाटपामध्ये सहभागी झाला होता.
As Maharashtra is facing severe drought this year again,Our @Khalsa_Aid team is in Nashik to provide water relief & everyday 125000 litres of water is distributed in villages and supplied to the villagers through common wells. @KapilSharmaK9 @RandeepHooda @MikaSingh @RaviSinghKA pic.twitter.com/yIfOBRaRAJ
— Amarpreet Singh (@amarpreet_ka) June 11, 2019
इतक्यावरच रणदीप थांबला नसून त्याने आपल्या सोशल मिडिया अकाऊण्टवरुन सरकारने दुष्काळावर कायमचा उपाय शोधावा अशी विनंतीही सरकारी यंत्रणांकडे केली आहे. इन्स्ताग्रामवर रणदीपने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो म्हणतो, ‘मी आता वेळे गावामध्ये आहे. येथे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आहे. सर्व विहरी कोरड्या पडल्या आहेत. येथे दर उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असते. या परिसरामध्ये दर वर्षी दुष्काळ पडतो. यंदा येथे खालसा एड संस्थेचे स्वयंसेवक काम करत आहेत. दररोज या गावामध्ये ‘खालसा’मार्फत २५ ते ३० पाण्याचे टँकर पुरवले जातात. मी सरकारला विनंती करतोय की त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष देऊन या समस्येवर कायमचा उपाय शोधावा. या परिसरामध्ये अनेक धरणे आहेत मात्र येथील लोकांना तेथील पाणी मिळत नाही,’ असं या व्हिडिओमध्ये रणदीप सांगताना दिसतो.
अशाप्रकारे ‘खालसा एड’च्या माध्यमातून समाजसेवेसाठी रणदीपने पुढाकार घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने मागील वर्षी त्याच्या वाढदिवसाच्या वेळी तो केरळला गेला होता. तेथील पुरग्रस्तांना त्यांने अन्नाचे वाटप केले होते. ‘खालसा एड’च्या अनेक समाजसेवी उपक्रमांमध्ये रणदीप हिरहीरीने भाग घेतो. २०१७ साली गणुपती विसर्जनानंतर तो ‘खालसा एड’ने आयोजित केलेल्या जुहू समुद्रकिनाऱ्याच्या साफसफाई मोहिमेमध्ये सहभागी झाला होता.