अकोले : भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रास काल, शुक्रवारी मुसळधार पावसाने झोडपले. प्रवरा नदी उगमस्थानाजवळील रतनवाडी येथे २४ तासांत १६६ मिमी, तर घाटघरला १४८ मिमी पाऊस पडला. भंडारदऱ्याचा विसर्ग सायंकाळी ६ हजार ८६३ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. सायंकाळी भंडारदरा पाणीसाठा ७ हजार ७५२ दलघफू (७०.२२ टक्के), निळवंडेत ५ हजार ३६३ दलघफू (६४.७८ टक्के), मुळा नदी विसर्ग ८ हजार ७६९ क्युसेक, तर साठा १५ हजार २९१ दलघफू (५८ टक्के) झाला होता.
भंडारदरा धरणाजवळील ‘रंधा फॉल’ जोशात कोसळू लागला आहे.तालुक्यातून उगम पावणाऱ्या मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी, कृष्णवंती या सर्व नद्या कमी-अधिक प्रमाणात वाहत्या झाल्या आहेत. कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य पट्ट्यात कमी झालेला पावसाचा जोर पुन्हा वाढला. काल दिवसभर पाणलोटात मुसळधार पाऊस कोसळला. पाणीपातळी नियंत्रणासाठी भंडारदरा धरणातून दिवसभरात २९६ दलघफू पाणी सोडण्यात आले. त्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात २४ तासांत ४२६ दलघफू पाण्याची भर पडली. निळवंडे धरणातून सध्या सिंचनासाठी ६०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यासाठी ६४ दलघफू पाणी वापरले गेले.
मुळा पाणलोट क्षेत्रातील अंबित, पचनई, कामशेत, लव्हाळी परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुळा धरणात सलग दुसऱ्या दिवशी अर्धा टीएमसीपेक्षा जास्त म्हणजे ५४५ दलघफू नवीन पाणी जमा झाले. कोतुळजवळ मुळा नदीचा विसर्ग सकाळी ४ हजार ४२९ क्युसेक होता. तुडुंब भरलेल्या आढळा धरणाच्या सांडव्यावरून सकाळी १९८ क्युसेक पाणी नदीपात्रात पडत होते, तर म्हाळुंगी नदीचा विसर्ग ३८ क्युसेक होता.
आजचा पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे
भंडारदरा ७०, घाटघर १४८, पांजरे ८६, रतनवाडी १६६, वाकी ६८, निळवंडे १५, कोतुळ २, अकोले ११.