संगमनेर तालुक्यामध्ये यापूर्वी कधीही न दिसलेल्या रानगव्याचे वास्तव्य आढळून आले. मात्र या रानगव्याचा अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने रक्तबंबाळ होऊन, तडफडून मृत्यू झाला. या महामार्गाला प्राण्यांना जाण्या येण्या साठीची मार्गिका असती, तर कदाचित या त्याला जीवन मिळाले असते. गव्याच्या अशा प्रकारच्या मृत्यूने प्राणी प्रेमींमधून नाराजीची भावना व्यक्त करण्यात आली.

पुणे नाशिक मार्गावरील संगमनेर तालुक्यातल्या डोळासने गावच्या हद्दीत काल पहाटेच्या सुमारास हा प्रकार झाल्याचे उघडकीस आले. पहाटेच्या अंधारात गवा महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात होता. तो महामार्गावर येताच भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झालेला गवा रक्तबंबाळ अवस्थेत तेथेच तडफडत पडून होता. दिवस उजाडताच शाळकरी विद्यार्थी आणि डेअरीत दूध घालण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांच्या नजरेस घायाळ अवस्थेतील गवा पडला. त्यानंतर मार्गावरून जाणारे वाहन चालकही तेथे थांबले. या भागात प्रथमच दिसलेला हा प्राणी पाहण्यासाठी लोकांनी तेथे खूप गर्दी केली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारीही तेथे दाखल झाले. परंतु तोपर्यंत गोव्याचा मृत्यू झाला होता. त्याचे धूड ताब्यात घेत वन कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदन केले.लगतच्या अकोले तालुक्यात असलेले कळसुबाई अभयारण्य आणि संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील डोंगररांगांमध्ये विविध प्राणी प्राण्यांचा अधिवास आहे. या भागात सर्वाधिक प्रमाणात बिबटे, तरस आदी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर अधिवास असल्याचे आढळून आले आहे. परंतु रानगव्यासारखा महाकाय प्राणी आढळल्याची अधिकृत नोंद यापूर्वी कोठेही नाही. लगतच्या जुन्नर तालुक्यातून अथवा माळशेज घाटातून भरकटत हा गवा संगमनेर तालुक्यातल्या पठार भागात पोहोचला असावा, असा कयास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बिबट्याप्रमाणेच रानगवा देखील वन्यजीव संरक्षित प्राणी आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या कोथरूड भागात असाच भरकटून रानगवा पोहोचला होता. त्यावेळी झालेल्या गर्दीने भांबावलेल्या रानगव्याचा मृत्यू ओढवला होता. या घटनेची आठवण काल संगमनेरकरांना झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामार्ग प्राधिकरणाला कधी जाग येणार ?

पुणे नाशिक महामार्ग बांधताना त्यात अनेक त्रुटी प्रथमपासूनच आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या आहेत. न्यायालय, हरित लवादाकडे दावे दाखल केले तरी महामार्ग प्राधिकरण त्रुटी दूर करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. महामार्गामुळे त्या परिसराचे दोन भाग होतात. भर वेगात जाणारी वाहने, रात्रीच्या वेळी वाहनांच्या दिव्यातून पडणारा प्रखर प्रकाश, आवाज यामुळे प्राण्यांना महामार्ग ओलांडून जाणे अशक्य होऊन बसते. तरीही प्राण्यांनी मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला, तर वाहनांच्या धडकेत यापूर्वीही अनेक प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झालेल्या प्राण्यांमध्ये बिबटे, तरस यांसह काही छोट्या मोठ्या प्राण्यांचा समावेश आहे. या महामार्गावर ठिकठिकाणी प्राण्यांना जाण्या येण्यासाठीची भुयारी मार्गिका ( अंडरपास ) होणे अत्यंत गरजेचे असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले.