वर्षभरातच नागझरी- रावते रस्त्यावर मोठय़ा भेगा; प्रशासनाचे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेमेंद्र पाटील, बोईसर

पालघर तालुक्यातील रावते- नागझरी रस्ता गेल्या वर्षी बांधण्यात आला असला तरी वर्षभरात या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्हा परिषदेमार्फत बांधलेल्या या रस्त्यावर देखरेख करणाऱ्या अभियंत्याला ‘आदर्श’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र आदर्श पुरस्कार मिळवणाऱ्या या अभियंत्याने बांधलेल्या रस्त्यावर मोठय़ा भेगा पडल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नागझरी नाका ते रावते रस्त्याचे गेल्या वर्षी काम करण्यात आले. १९५ मीटर लांब आणि ५.५ मीटर रुंद असलेल्या या रस्त्यावर १५ लाख ९५ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यातील रावते भागात हा रस्ता सीमेंट-काँक्रिटचा करण्यात आला. मात्र एका वर्षांत रस्त्याला मोठी भेग पडली आहे. क्राँक्रिट रस्ता बनवताना खोदाई करून रोडरोलरने व्यवस्थित खडी बसवणे आवश्यक असते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे या रस्त्याच्या दुरवस्थेवरून दिसून येत आहे.

या रस्त्याचे अंदाजपत्र आणि कामाची देखरेख अभियंता हेमंत भोईर यांनी केली होती. हा रस्ता तयार झाल्यानंतर काही महिन्यातच रस्त्यावर भेगा

पडल्या होत्या. मात्र त्यावर डांबर टाकून भेगा बुजवण्यात आल्या होत्या. कालांतरोन या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात भेगा पडल्या आहेत. आदर्श कामकाज केले म्हणून हेमंत भोईर यांना २०१६-१७मध्ये पालघर जिल्हा परिषदेने ‘आदर्श पुरस्कार’ देऊन सन्मानित केले होते. भोईर यांच्याशी या रस्त्याच्या कामकाजासंदर्भात माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येणारे बांधकाम साहित्य तपासणी करण्यासाठी पाठवणे बंधनकारक असते. परंतु फक्त अभियंत्यांचे पत्र घेऊन तपासणीसाठी लागणारी शासकीय रक्कम आणि तेवढीच रक्कम वाढीव

देऊन चांगल्या दर्जाचे बांधकाम साहित्य असल्याचे प्रमाणपत्र आणले जात असल्याचे एका ठेकेदारांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यातील करण्यात आलेल्या कामांची तपासणी केल्यास कोटय़वधींचा भ्रष्टाचार उघड होईल, असेही त्यांनी सांगितले.

नागझरी-रावते रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

-संजय कुलकर्णी, उपअभियंता, बांधकाम विभाग, पंचायत समिती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raote nagzari road in bad condition in palghar taluka
First published on: 16-01-2019 at 01:58 IST