राज्यात ईडीकडून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई केली जात असल्याची टीका सातत्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज ईडीनं मोठी कारवाई करत प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील एकूण ६ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. या सदनिका आणि एकूण जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ६ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट करून राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं कारवाई केली आहे. शेल कंपन्यांच्या माध्यमातून हा घोटाळा झाला असून त्यासंदर्भात ईडीनं मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. घोटाळेबाजांना सोडणार नाही”, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा एक एंट्री ऑपरेटर असून त्याच्या माध्यमातून ३० कोटींचं कर्ज साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड यांना शेल कंपन्यांच्या माध्यमातून ट्रान्सफर केलं गेलं. त्याच पैशातून या ११ सदनिकांची खरेदी केली गेली, असं सांगितलं जात आहे. तसेच, भविष्यात श्रीधर पाटणकर यांची देखील ईडीच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

दरम्यान, नेमकं हे प्रकरण काय आहे, यासंदर्भात ईडीकडून माहिती देण्यात आली आहे. ईडीकडून आज पुष्पक ग्रुपची एक कंपनी असलेल्या पुष्पक बुलियनच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिडेटनं खरेदी केलेल्या ११ सदनिका ताब्यात घेण्यात आल्या आहेत. साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे.

२०१७मध्ये गुन्हा दाखल!

याआधी ईडीनं पुष्पक बुलियन आणि ग्रुप ऑफ कंपनीजविरोधात ६ मार्च २०१७ रोजी आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच, याआधीच ग्रुपच्या मालकीची २१ कोटी ४६ लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त करम्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुष्पक ग्रुपशी संबंधित महेश पटेल यांनी पुष्पक ग्रुपशी संबंधित २०.०२ कोटींचा निधी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या शेल कंपन्यांकडे ट्रान्सफर केला. त्यांनी पुढे एकूण ३० कोटींचा निधी त्यांची अजून एक शेल कंपनी हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून असुरक्षित कर्ज स्वरूपात श्री साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिडेटकडे ट्रान्सफर केला. त्यामुळे महेश पटेल यांच्याकडून आलेला निधी साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून रीअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आला. याच पैशातून ठाण्याच्या निलांबरी अपार्टमेंटमधील ११ सदनिका खरेदी करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.