समाजवादी विचारधारा ही नैतिकतेवर आधारित व इतिहासावर मात करणारी आहे. राष्ट्र सेवा दलाचा पाया विस्मरणात जाऊ नये म्हणून पुनर्बाधणी करावी लागेल अन्यथा पुढील वाट बिकट बनेल. हीच वेळ आत्मपरीक्षणाची असून भूतकाळाबरोबर वर्तमानाचे भान ठेवा, असा सल्ला राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य यांनी येथील काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात आयोजित राष्ट्र सेवा दलाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यात दिला. भारतातील सर्वसामान्य माणूस कधीच धर्माध नव्हता व राहणार नाही. राष्ट्र सेवा दलाला आता नुसते समाजवादी राहून चालणार नाही. महिलांवरील अत्याचार, गुलामगिरी याविरुद्ध प्रखरपणे लढा उभारत असतानाच सेवा दलाला जातीअंताची लढाई लढावी लागेल, असेही डॉ. वैद्य यांनी सांगितले.
याप्रसंगी राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक यांनी आपण शक्तिहीन नाही याची सेवा दल सैनिकांनी खूणगाठ बांधण्याचे आवाहन केले. संविधान समाजनिर्मितीसाठी डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आपल्यासोबत असल्याने समतावादी समाजनिर्मितीसाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे, असे सूतोवाच त्यांनी केले. तर स्वातंत्र्याची अपूर्ण राहिलेली लढाई पूर्ण करण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करावी लागेल, असे सेवा दलाचे राज्य सचिव सदाभाऊ मगदूम यांनी नमूद केले. सेवा दलाने महाराष्ट्राचे वैचारिक नेतृत्व केल्याचे मत विश्वस्त व माजी न्यायाधीश प्रकाश परांजपे यांनी मांडले. सेवा दलाचे विश्वस्त व माजी आमदार जे. यु. ठाकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद कपोले, राष्ट्रीय संघटक माधवबापू गुरव यांनीही या मेळाव्यास मार्गदर्शन केले.
वसंत ठाकरे लिखित ‘दुर्भिक्ष्य पाण्याचे- प्रलय पाण्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अभिजित वैद्य यांसह इतरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सेवा दल वाढीसाठी निर्धार व्यक्त करण्यात आला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास साने गुरुजी यांचे नाव देण्यात यावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली. ज्येष्ठ सैनिक चरणभाई शहा, रमाकांत देसले, रमेश दाणे, बापू ठाकूर, रवि देवांग, रणजित ठाकरे, झुंबरलाल शर्मा, मुकुंद बरीदेसकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कवी जगदीश देवपूरकर यांनी केले. प्रास्ताविक सेवा दलाचे राष्ट्रीय सदस्य अ‍ॅड. मिलिंद बोरसे, गो. पी. लांडगे, रमेश पवार, मनोज वाघ, अनिल देवपूरकर यांनी केले.