राजापूर : गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यामध्ये बिबट्याच्या मुक्त संचाराने लोकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. अशातच कोंबड्याची शिकार करण्यासाठी थेट खुराड्यात घुसलेल्या बिबट्याची खुराड्यातच अडकून पडल्याची घटना तालुक्यातील करक तांबळवाडी येथे घडली आहे. खुराड्याच्या लोखंडी तारा कापून बिबट्याची सुखरूपपणे सुटका केल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

खुराड्यामध्ये अडकलेला बिबट्या सुमारे एक ते दिड वर्षाचा मादी जातीचा असल्याचेही वनविभागाने स्पष्ट केले आहे. करक येथे कोंबड्याच्या खुराड्यामध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने सुटका केलेली असताना तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बिबट्याचा वावर आणि दहशत कायम राहिलेली आहे. त्यामध्ये गावपडवे येथील अनिल भोसले या शेतकर्‍याच्या सुमारे वीस-पंचवीस हजार रुपयांच्या बैलाला बिबट्याने ठार मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून वनविभागाने त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

हेही वाचा – तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जमिनीवर साडेतेराशे कोटींच्या गुंतवणुकीतून ३०० मेगावॅटचा सोलर प्रकल्प

याबाबत वनविभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार करक तांबळवाडी येथील आत्माराम गंगाराम कांबळे यांच्या नवीन बांधकाम सुरु असलेल्या घराजवळ लोखंडी तारेच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्या अडकल्याची माहिती करकचे पोलीस पाटील यांच्यामार्फत वनविभागाला मिळाली. त्यानुसार रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, राजापूरचे वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार, वनरक्षक जालने, रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, दीपक म्हादये, नितेश गुरव, अमित बाणे, निलेश म्हादये हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर खुराड्याच्या लोखंडी तारा कापून बिबट्याची सुखरूपपणे सुटका करण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर, बिबट्याची राजापूरचे पशुधन विकास अधिकारी यांनी तपासणी केली असता बिबट्या सुस्थितीत असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा – Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिपळूणच्या वनसंरक्षक प्रियांक लगड, रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सुटका करण्यात आलेल्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.