Ratnagiri Accident गणेशोत्सवला अवघे तीन दिवस उरले आहेत. दरम्यान मुंबईतले चाकरमानी गावी जाण्याची लगबग सुरु झाली आहे. कोकणातला गणेशोत्सवही खास असतोच. मुंबईत कामानिमित्त आणि नोकरीसाठी आलेले चाकरमानी पुन्हा कोकणात परतत आहेत. दरम्यान, गणेशभक्तांच्या खासगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ खासगी बसला अचनाक आग लागली असून या आगीत ही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ज्यावेळी आग लागली, तेव्हा बसमधून ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होते.
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस मुंबईहून मालवणच्या दिशेनं जात होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही बस रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ आली असता, बसने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात येताच बस चालकाने तातडीने बस रस्त्याच्या बाजुला घेतली आणि प्रवाशांना खाली उतरवलं. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातात कुणीही जखमी झालं नाही. मात्र गणेशभक्तांचं सर्व सामान जळून खाक झालं आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, सुदैवाने जिवीतहानी नाही
बसला आग लागल्याची ही घटना समजताच खेड महापालिकेचं अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. तसेच प्रवाशांना पर्यायी वाहन उपलब्ध करून त्यांना आपापल्या गावी पाठवलं आहे. बसला ही आग नेमकी कशामुळे लागली याचं ठोस कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने प्रवाशांचा जीव वाचला आहे.
प्रवासी घाईने खाली उतरले, सामान काढण्यासाठी वेळच मिळाला नाही
बसमध्ये तब्बल ४० ते ४५ प्रवासी होते. रविवारी पहाटे कशेडी बोगद्याच्या परिसरातून जात असताना या बसचा टायर प्रचंड गरम झाला. त्यामुळे टायरने पेट घेतला. त्यानंतर ही आग वेगाने पसरायला सुरुवात झाली. सुदैवाने ही गोष्ट बसचालकाच्या लक्षात आली. त्याने तातडीने प्रवाशांना सावध करुन बसमधून खाली उतरवले. त्यानंतर बघता बघता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली आहे. News 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे. सला आग लागल्याचं लक्षात येताच सगळे प्रवासी घाईघाईत खाली उतरले. त्यांना बसच्या डिकीत ठेवलेले हे सामान बाहेर काढायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे आगीमध्ये हे सर्व सामान जळून खाक झाले. मात्र, सुदैवाने एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. यानंतर संबंधित प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आलं आहे.