रत्नागिरी : राज्यात रत्नागिरी जिल्ह्याने शैक्षणिक क्षेत्रातआपले एक वेगळे नाव कोरले आहे. या क्षेत्रात झालेली मोठी प्रगती पाहता भविष्यात रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक हब बनणार यात कोणतीच शंका नाही, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला. मालगुंड येथील बिर्टीशकालीन जी.प.च्या आदर्श जीवन शिक्षण शाळा क्रमांक एकच्या १७५ व्या वर्षाच्या (शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्ष) उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले की, रत्नागिरी नररत्नांची खाण आहे. या जिल्ह्यात अनेक महान व्यक्तिमत्त्वे झाली आहेत. त्यांच्या आदर्शाचे अनुकरण करण्याची आपल्याला गरज आहे. आदर्श जीवन शिक्षण शाळेला १७५ वर्षे पूर्ण होणे, ही मालगुंडवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. पुर्वीचे आणि आताचे शिक्षण यात मोठा फरक आहे. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी आणि पालकांनी आधुनिक शैक्षणिक साधनांचा स्वीकार करणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढे येण्याची गरज आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

यावेळी उदय सामंत यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन, लोगोचे अनावरण आणि वृक्षारोपण करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते शाळेतील ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शतकोत्तर अमृतमहोत्सवी समितीचे सदस्य गजानन पाटील यांनी केले. त्यांनी शाळेचा इतिहास सांगत, शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि शाळेच्या विकासासाठी पालकमंत्र्यांकडे विनंती केली. समितीचे सदस्य सुनील मयेकर यांनीही शाळेच्या विकासाकडे लक्ष घालण्याची विनंती पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.

या सोहळ्याला अध्यक्ष सुनील मयेकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष गजानन पाटील, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, श्रीकांत मेहेंदळे, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सरपंच श्वेता खेऊर यांच्यासह मोठ्या संख्येने आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.