रत्नागिरी: जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेत प्रश्नाचा भडीमार करत अधिकारी व शिक्षक वर्गाला चांगलेच धारेवर धरले. जिल्ह्यातील ५ हजार ८३० शिक्षकांपैकी किती शिक्षकांनी शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत ? प्रधानमंत्री श्री अंतर्गत खर्च झालेल्या पैशातून काय काम केले ? तसेच विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी कोणते उपक्रम राबवण्यात आले? असे प्रश्न सामंत यांनी विचारुन एकप्रकारे सर्वांची शाळाच घेतली.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीस अतिरिक्त् मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, शिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, वाडामधील एका शिक्षकांने शाळेमध्ये विश्रांतीगृह निर्माण केले आहे. झोप आलेल्या मुलांना वडीलांप्रमाणे तो त्यांना झोपवतो. झोप पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याला शिकवले जाते. सामाजिक काम म्हणून शिक्षक ३६५ दिवस शिकविण्याचे तो काम करतो. कोणत्याही संघटनेत काम करत नाही. हातखंबा शाळेतील गुरव नावाचा शिक्षक ज्या शाळेत जातो, तेथे बाग तयार करतो. काही शाळातील मुलं इंग्रजी आणि मराठी दोन्ही लिखाण एकाच वेळी करतात. अशा नाविन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन ठेवायला हवे, असे शिक्षक शोधा अशा सुचना सामंत यांनी केली.
प्रधानमंत्री श्री उपक्रमात १३ शाळांमध्ये किती पैसे खर्च झाले? कशावर खर्च झाले? मिरकरवाड्यातील शाळेवरही झालेल्या खर्चाबाबत १५ दिवसात अहवाल द्या. १३ शाळांसाठी दिलेल्या निधी बाबत मुख्याध्यापकांकडून सविस्तर अहवाल घ्यावा. यामध्ये काही गैरप्रकार आढळला तर संबंधितांवर फौजदारी दाखल करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
नैसर्गिक वाढ असणाऱ्या पटसंख्येबाबत शाळेची परवानगी थांबता कामा नये, असे सांगून पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, पोषण आहाराबाबत ॲप तयार करावे. शालेय प्रवेशोत्सवाबाबत ज्या अधिकाऱ्यांनी शाळा भेटी दिलेल्या नाहीत, अशा अधिकाऱ्यांचा अहवाल सादर करावा. ज्या शाळांमध्ये पटसंख्या वाढलेली आहे, याबाबतची माहिती गावागावात जाऊन सांगितली पाहिजे. पटसंख्या वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम करायला हवेत. इस्त्रो आणि नासाला सोबत पाठविताना शिक्षकांमध्येही स्पर्धा घ्यावी, असे ही पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठकीत सांगितले.