रत्नागिरी – वांरवार सोशल मीडियामध्ये पक्षांत्तराच्या बातम्या आल्याने आपल्याबद्दल गैरसमज करण्यात आला. मला पक्षातून बडतर्फ करण्यात आल्याचे देखील सोशल मीडियातूनच कळले. राज ठाकरेंचा आमच्याकडे थेट फोन नंबर नाही. केवळ मेसेज करता येतो, असा नंबर दिला आहे. त्यांच्या बरोबर संवाद झाला असता तर ही वेळ आली नसती, अशी खंत मनसेचे माजी सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी व्यक्त केली आहे. यात खेडेकर यांनी सोशल मीडियाला जबाबदार धरून मीडियावर आग पाखड केली आहे.

मनसेतून हकालपट्टी झाल्यावर खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत घेवून आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, माझं रेल्वेचं इंजिन थांबलं आहे, मला बडतर्फ केल्याचे पत्र सोशल मीडियावर पाहून धक्का बसला. हे पत्र माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट आहे. मी गेली तीस वर्षे पक्ष कुटुंबाशी जोडलेलो होतो, पण आजच्या पत्रामुळे या नात्याला ब्रेक लागला आहे, असे ही खेडेकर यांनी सांगितले.

खेडेकर म्हणाले, मनसेचे कोकणात मी बीजे रुजवली. खेड नगर परिषद पंधरा वर्षे मनसेच्या ताब्यात राहिली. मी पहिल्यांदाच थेट नगराध्यक्ष झालो होतो. कोविडच्या काळात, पक्ष संकटात असताना मी नेहमी लोकांसोबत राहिलो. पण आज माझ्या निष्ठेला संशयाने पाहिले गेले. कामानिमित्त भाजपच्या काही नेत्यांना भेटलो म्हणून पक्षांतर करतोय असा गैरसमज निर्माण केला गेला. आपण कोणत्याही पक्षप्रवेशाचा विचार केलेला नव्हता, हे ठामपणे खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्याला तडीपारीपासून वाचवण्यासाठी मंत्री नितेश राणेंना भेटलो. विकासासाठी सत्ताधाऱ्यांना भेटणे आवश्यक असते. पण त्यातून माझ्यावर संशय घेतला गेला. साहेबांना भेटायचा मी खूप प्रयत्न केला, पण अद्याप भेट मिळाली नाही. जर हे पत्र राज ठाकरेंनी स्वतः दिले असते, तर आदेश म्हणून मी स्वीकारले असते. मात्र गैरसमजातून माझ्या वर कारवाई केली आहे. खेडेकर म्हणाले की, माझे इंजिन थांबलेले असले तरी हातात घेतलेले शिवधनुष्य अर्धवट ठेवणार नाही. आपण पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेणार असेही खेडेकर यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, मला अजिबात घाई नाही. योग्य वेळेची वाट पाहूनच पुढील निर्णय घेईन. लवकरच कार्यकर्त्यांसोबत मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

पक्षातील नेत्यांच्या संवादाच्या अभावावरही त्यांनी नाराजी व्यक्त करत राज ठाकरेंचा आमच्याकडे थेट फोन नंबर नाही. केवळ मेसेज करता येतो, असा नंबर दिला आहे. संवाद झाला असता तर ही वेळ आली नसती, असे खेडेकर म्हणाले.