दिवंगत आमदार देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते दिलीप प्रभावळकर, गौरव पुरस्कार मुंबईचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील तर साहित्यरत्न पुरस्कार पत्रकार उत्तम कांबळे यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत ऊर्फ बंडा मिनियार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. हा पुरस्कार वितरण २१ सप्टेंबर रोजी जयसिंगपूर नगरपालिकेच्या छत्रपती राजर्षी शाहू नाटय़गृहात सायंकाळी ५ वाजता होणार आहे.    
रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी सहा दशकांहून अधिक काळ राजकारण, सहकार, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात व्यापक कार्य केले. स्वातंत्र्यलढय़ामध्ये त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय होती. देशाच्या घटनेवर स्वाक्षरी करणाऱ्या प्रमुखांमध्ये त्यांचा समावेश होता. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून त्यांनी साखर कारखानदारीत वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले. त्यांच्या कार्याची स्मृती जागृत राहावी व नवीन पिढीसमोर त्यांचा आदर्श उभारावा यासाठी विचार मंचच्या वतीने प्रतिवर्षी पुरस्कार दिला जातो, असा उल्लेख करून मिनियार म्हणाले, या वर्षी या पुरस्कार विजेत्यांमध्ये कोल्हापूर येथील हेल्पर्स ऑफ हँडिकॅप्ड या संस्थेच्या संस्थापिका नसीमा हुरजूक यांना समाजभूषण तर हिंदकेसरी किताबाचे मानकरी पहिलवान दीनानाथसिंह यांना कुस्ती क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल भूषण पुरस्कार दिला जाणार आहे.
मंचने गेल्या दोन वर्षांपासून शिरोळ तालुकास्तरीय पुरस्कार देण्याची प्रथा सुरू केली आहे. या वर्षी क्रांती पुरस्कार दानोळी येथील सुकुमार पाटील (सखाप्पा) या गरीब रुग्णांना मदतीचा आधार देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांस दिला जाणार आहे. ८ वर्षांपूर्वी रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचची स्थापना झाली आहे. मंचच्या वतीने यापूर्वी प्रभाकर पणशीकर, रामदास फुटाणे, सिंधुताई सकपाळ, मधु मंगेश कर्णिक, जगदीश खेबूडकर, गणपत पाटील, मेधा पाटकर, डॉ. श्रीराम लागू, प्रकाश आमटे, सुभाष पाटील, डॉ. अभय बंग आदींना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, असे मिनियार यांनी सांगितले.