Rave Party : भारतात अनेकदा रेव्ह पार्ट्या त्यामुळे होणारी कारवाई, छापेमारी हे सगळं चर्चेत असतं. महाराष्ट्रातल्या पुणे मुंबई या ठिकाणीही झालेल्या सिक्रेट रेव्ह पार्टीजवर पोलिसांनी कारवाई केल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत. आता रेव्ह पार्टी पुन्हा चर्चेत आली आहे एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अटकेमुळे. प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणात खराडी भागातून अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. पण रेव्ह पार्टी काय असते? आपण जाणून घेऊ.
काय असते रेव्ह पार्टी?
रेव्ह या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर तो आहे कुठलंही नियंत्रण नसलेली बाब. केंब्रिज विद्यापीठाने हा अर्थ सांगितला आहे. साहजिकच पार्टीला रेव्ह पार्टी म्हटलं की त्यात कशाचंच नियंत्रण राहात नाही. हा एक सोशल इव्हेंट असतो जो गुप्तपणे सांकेतिक कोडच्या मदतीने आयोजित केला जातो. अनेक लोक एकत्र येतात. खाणं-पिणं असतंच शिवाय ड्रिंक्स, कोकेन, गांजा, हशीश, चरस, अफू अशा सगळ्या गोष्टींची मुक्त देवाणघेवाण होत असते. नशेची झिंग आली की त्यात बेधुंद व्हायचं आणि मनसोक्त नाचगाणी करायची, धिंगाणा घालायचा असं या रेव्ह पार्टीचं स्वरुप असतं. अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या पार्टीलाच रेव्ह पार्टी असं म्हटलं जातं.
रेव्ह पार्टीत काय काय प्रकार चालतात?
१) रेव्ह पार्टीत मुख्य प्रकार असतो अंमली पदार्थ घेऊन झिंगणं. डान्स आणि मस्ती.
२) डान्स आणि मस्तीच्या नावाखाली अश्लील चाळेही सुरु असतात. शिवाय ड्रग्जचा मुक्त हस्ताने वापर रेव्ह पार्टीत केला जातो.
३) रेव्ह पार्टीत दारु, सिगारेट, हुक्का यांसह अंमली पदार्थांचं सेवन मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणी करत असतात. ही पार्टी एका सिक्रेट कोडने आयोजित केली जाते.
४) अनेकदा जोडपी या पार्ट्यांमध्ये प्रवेश करतात आणि मुले आणि मुली एकत्र मजा करतात आणि नाचतात. नशेमुळे पोलीस अशा प्रकारच्या पार्टीवर कारवाई करतात.
भारतात रेव्ह पार्टीसंदर्भात कुठलाही विशेष कायदा नाही
भारतात रेव्ह पार्टीसाठी कोणता विशेष कायदा नाही. पण जर कोणत्या पार्टीमध्ये अन्य नियमांचं उल्लंघन होत असेल तर, कारवाई केली जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्याला एखाद्या पार्टीच्या म्युझिकची समस्या असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे, जर रेव्ह पार्टी नावाच्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज आढळले किंवा कोणी मद्यधुंद आढळले तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. आज तकने हे वृत्त दिलं आहे.
रेव्ह पार्टीत सहभागी होणं गुन्हा आहे का?
रेव्ह पार्टीत सहभागी होणं हा गुन्हा नाही. मात्र रेव्ह पार्टीमध्ये जाऊन अंमली पदार्थांचं सेवन करणं, अश्लील चाळे करणं, ड्रग्ज घेऊन जाणं, अंमली पदार्थ खरेदी किंवा विक्री करणं या सगळ्या गोष्टी गुन्हाच आहेत. या सगळ्या गोष्टी करताना जर रेव्ह पार्टीत गेलेली व्यक्ती आढळली तर पोलीस कारवाई करतातच. शिवाय एखाद्या माणसाने रेव्ह पार्टीत सहभाग घेतला आणि त्या ठिकाणी त्याने ड्रग्ज घेतले नाहीत तरीही ड्रग्जचं सेवन केलं जात असेल तर त्या व्यक्तीचीही चौकशी पोलीस करु शकतात.