रवी राणा-बच्चू कडू वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. तर बच्चू कडू यांनीही आज अमरावतीत आयोजित मेळाव्यात याबाबत भूमिका स्पष्ट करत रवी राणा यांना माफ केल्याचे विधान केले. दरम्यान, बच्चू कडूंच्या विधानानंतर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “…या कारभाराला एकनाथ शिंदेच जबाबदार” मुंबई महापालिकेच्या कॅग चौकशीवरून अरविंद सावंतांचं थेट विधान

काय म्हणाले रवी राणा?

“देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर मी माझ्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. मी दोन पावलं मागे आल्यानंतर बच्चू कडूंनी चार पावलं मागे घेतले आहेत. तसेच त्यांनी माझे आभारही मानले आहे. त्यामुळे आमच्यातला वाद आता मिटला आहे”, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे.

हेही वाचा – ‘ये डर मुझे अच्छा लगा, आय…’, फलक चोरीवरून सुषमा अंधारेंची जोरदार टोलेबाजी

“महाराष्ट्रात तरुणांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच राज्याला आता सक्षम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. ते दोन्हीही माझे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीने आम्ही आता राज्यातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे”, असेही ते म्हणाले.