Ravindra Chavan and Devendra Fadnavis on BJP Welcomes Palghar Sadhu Murder Accused : पालघर येथे १६ एप्रिल २०२० रोजी जमावाने दोन साधूंची हत्या केली होती. त्यावेळी राज्याच्या राजकारणात या घटनेवरून राजकारण चांगलंच तापलं होतं. या हत्येनंतर भारतीय जनता पार्टीने तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारवर, प्रामुख्याने तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच सरकार हिंदूविरोधी असल्याच्या टिप्पण्या केल्या होत्या. मात्र, याच प्रकरणात भाजपाने ज्या व्यक्तीवर गंभीर आरोप केले होते त्या व्यक्तीने आता भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाने मोठ्या जल्लोषात त्या व्यक्तीचं पक्षात स्वागत केलं. यामुळे आता भाजपाला टीकेचा सामना करावा लागत आहे.
पालघर साधू हत्याकांड प्रकरणी भारतीय जनता पार्टीने काशिनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, आता त्याच काशिनाथ चौधरींना रविवारी (१६ नोव्हेंबर) भाजपात पक्षप्रवेश देण्यात आला. यावरून विरोधकांनी टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव केली आणि विरोधकांवरच पलटवार केला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात आला आहे. या पक्षप्रवेशावरून आमच्यावर जे लोक आरोप करत आहेत ते कालपर्यंत का गप्प होते? चौधरी कालपर्यंत त्यांच्याबरोबरच होते तेव्हा असे आरोप का केले नाहीत? याचाच अर्थ कालपर्यंत ते (चौधरी) विरोधकांसाठी चांगले होते आणि आज ते आमच्याकडे आले तर वाईट झाले? त्या प्रकरणाचा पूर्ण तपास करून काशिनाथ चौधरी यांना भाजपात प्रवेश देण्यात आला असल्याचं आमच्या स्थानिक नेत्यांनी सांगितलं आहे.
प्रदेशाध्यक्षांकडून पक्षप्रवेशाला स्थगिती
दरम्यान, विरोधकांच्या टीकेनंतर काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी स्थगिती दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. चव्हाण यांनी यासंदर्भात पालघर जिल्हाध्यक्षांना पत्र देखील पाठवलं आहे.
आमदार रोहित पवारांचा फडणवीसांना चिमटा
या घटनेवरून आता भाजपात एकमत नसल्याची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रवींद्र चव्हाण यांच्यात एकमत नसल्याची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून भाजपाला चिमटा काढला आहे. त्यांनी यासंदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, “भाजपाने पालघर साधू हत्या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केले होते त्यांचाच पक्षप्रवेश करून घेतला आणि आज (१७ नोव्हेंबर) तोच पक्षप्रवेश कसा योग्य असल्याचे मुख्यमंत्री ठासून सांगत होते. मात्र, चौफेर टीका होताच भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सदर पक्षप्रवेश स्थगित केला आहे.”
रोहित पवार म्हणाले, “ना नीती ना मत्ता, प्रिय फक्त सत्ता” या तत्वाने चालणाऱ्या नव्या भाजपाला उशिरा का होईना शहाणपण सुचलं हे महत्वाचे आहे. असो, प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची क्लिनचीट देण्याची परंपरा तर खंडित केलीच शिवाय मुख्यमंत्र्यांच्या गृहविभागापेक्षा प्रदेशाध्यक्षांची तपास यंत्रणा मजबूत असल्याचं देखील दाखवून दिलं. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री महोदय प्रदेशाध्यक्षांच्या तपास यंत्रनेची मदत घेतील ही अपेक्षा!”
