‘गोपनीय’ पद्धतीने अर्ज मागवले, ११ पदांसाठी आज मुलाखती

प्रबोध देशपांडे, अकोला</strong>

राज्यातील उच्च शिक्षण विभागात सध्या सहसंचालक पदभरतीची लगीनघाई सुरू आहे. राज्यातील ११ पदांसाठी उद्या, ७ डिसेंबरला मुंबई येथे मुलाखती घेतल्या जाणार आहेत. गोपनीय पद्धतीने काढलेल्या पत्रानुसार अर्ज मागवत घाईगडबडीने प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने उच्च शिक्षण क्षेत्रात संशय व्यक्त केला जात आहे.

राज्यात प्रत्येक विभागात एक व इतर अशी एकूण ११ सहसंचालकांची पदे आहेत. या पदांवर शासकीय महाविद्यालय किंवा शासकीय संस्थांमधील प्राध्यापक किंवा सहायक प्राध्यापकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केली जाते. पुणे येथील उच्च शिक्षण संचालकांनी सहसंचालक पदांसाठी १८ नोव्हेंबरला पत्र काढून अर्ज मागवले. सहसंचालक या तात्पुरत्या स्वरूपातील पदावर नियुक्ती करण्यासाठी पदव्युत्तर पदवीमध्ये किमान ५५ टक्के गुण, आचार्य पदवी, प्राध्यापक किंवा सहयोगी प्राध्यापक म्हणून शिकवण्याचा १२ वर्षांचा अनुभव, प्रशासकीय कामकाजाचा तीन वर्षांचा अनुभव, आचार्य पदवी धारण केल्यावर किमान तीन प्रकाशने, कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे आदी अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या सेवातपशीलासह कार्यालय प्रमुखांमार्फत नमुन्यात अर्ज मागवण्यात आले.

सहसंचालक पदासाठी अर्ज मागवताना तात्काळ व गोपनीय असा उल्लेख पत्रावर करून ते सर्व शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य व शासकीय संस्थांच्या संचालकांना पाठवण्यात आले. वास्तविक पाहता पदभरतीची माहिती अधिकाधिक पद्धतीने प्रसारित झाली पाहिजे, असे अपेक्षित असते. उच्च शिक्षण विभागातील सहसंचालक यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यासाठी गोपनीय पद्धतीने अर्ज मागवण्यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल शिक्षणतज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्यात अस्थिर राजकीय वातावरणामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली. याच दरम्यान १८ नोव्हेंबरला एका गोपनीय पत्रान्वये सहसंचालक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले. त्यानंतर आता मुलाखतीही घेतल्या जाणार आहेत. सध्या सरकार स्थापन झाले असले तरी, शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खाते वाटप झाले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. उच्च शिक्षण विभागाला मंत्री नाहीत. अशा परिस्थितीत सहसंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. सहसंचालक पदावर वर्णी लागण्यासाठी मंत्र्यांची शिफारस महत्त्वाची ठरते. त्यामुळे उच्च शिक्षण विभागाला नवे मंत्री मिळण्यापूर्वीच सहसंचालकांच्या नियुक्त्या आटोपण्याची धडपड सुरू असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे. यासंदर्भात उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

केवळ पाच दिवसांत अर्ज मागवले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याच्या विविध भागातील उच्च शिक्षण सहसंचालकांच्या ११ पदांसाठी अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत अर्ज मागवण्यात आले. १८ नोव्हेंबरला पत्र काढून अर्ज सादर करण्यासाठी २२ नोव्हेंबर ही शेवटची मुदत देण्यात आली होती.