रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारी मध्ये घट झाली असून यामध्ये क्युआर कोडद्वारे पेट्रोलिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांमध्ये घट होण्यास मोठी मदत झाली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. १ हजार ३८८ दाखल गुन्ह्यांपैकी १ हजार १२१ गुन्हे उघड झाले असून आता पर्यत ८० टक्के गुन्हे उघड झाले असल्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारी २०२३-२४ या वर्षापेक्षा २०२४-२५ या आर्थिक वर्षात २३८ गुन्हे कमी झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये घरफोडी, चोरी, दंगा, आदी गुन्ह्यांचा समावेश असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. यावर्षी क्युआर कोडद्वारे पेट्रोलिंग या योजनेमुळे गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. खासगी व्यावसायिक आणि सरकारी आस्थापना यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार खासगी ३ हजार १२१ कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे एकूण १ हजार ३८८ दाखल गुन्ह्यांपैकी १ हजार १२१ गुन्हे उघड होण्यास मदत झाली आहेत. यात ८० टक्के गुन्हे उघड झाले आहेत.

खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आरोपीचा पाठपुरावा करण्यासाठी, त्याचा माग काढण्यासाठी, शोध घेण्यासाठी तसेच चेहरेपट्टीची ओळख पटविण्यासाठी मदत होते. तसेच तांत्रिक बाबींची उकल होण्यास मदत होते. गुन्ह्यांचे प्रमाण अधिक घटण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे प्रमाण वाढविण्याची गरज असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. जिल्ह्यातील चिपळूण आणि दापोली या शहरांमध्ये स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत डीपीडीसीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याची तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे. लवकरच या दोन्ही शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नागिरी जिल्ह्यात आर्थिक गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून, त्यासाठी सातत्याने जिल्हा पोलीस दल जनजागृती कार्यक्रमांवर जोर देत आहे. यात काही आरोपी परराज्यात, तर काही परदेशात राहून गुन्हेगारी करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, हाच महत्त्वाचा मार्ग आहे. तसेच गुन्ह्यांमध्ये आरोपीचा माग काढण्यासाठी डॉग स्कॉडचा महत्त्वाचा उपयोग होत असल्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.