व्यायामामुळे तंदुरुस्ती येते व ती महत्त्वाची असते, जिममध्ये जाऊन किंवा इतर कुठलाही शारीरिक व्यायाम केल्याने अनेक फायदे होतात, जास्तीत जास्त शारीरिक हालचाली केल्याने तेरा प्रकारच्या कर्करोगांची शक्यताही कमी होते, असा दावा एका नवीन अभ्यासात करण्यात आला आहे. शारीरिक निष्क्रियता ही नेहमीच सगळीकडे बघायला मिळते. फार थोडय़ा लोकांना व्यायामात रस असतो. जगातील ३१ टक्के लोक पुरेसा व्यायामच करीत नाहीत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटचे स्टीव्हन सी. मूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिका व युरोपातील बारा अभ्यासांतील निष्कर्षांच्या आधारे हे संशोधन केले असून ही माहिती १९८७ ते २००४ या काळातील आहे. शारीरिक क्रियाशीलता व सव्वीस प्रकारचे कर्करोग यांचा संबंध तपासून पाहण्यात आला. त्यात १४ लाख लोक व १,८६,९३२ कर्करोगग्रस्त यांचा समावेश होता. अकरा वर्षांच्या त्यांच्या अभ्यासात असे दिसून आले की, ज्यांची शारीरिक कार्यक्षमता जास्त होती, जे व्यायाम करीत होते त्यांच्यात २६ पैकी १३ कर्करोगांची शक्यता कमी झाली होती. एसोफेगल अ‍ॅडेनोकार्सिनोमा (४२ टक्के), यकृत (२७ टक्के), फुफ्फुस (२६ टक्के), मूत्रपिंड (२३ टक्के), गॅस्ट्रिक कार्डिया (२२ टक्के), एंडोमेट्रियल (२१ टक्के) याप्रमाणे कर्करोगाची शक्यता कमी झाली. नियमित व्यायामाने मायलॉइड ल्युकेमिया (२० टक्के), मायलोमा (१७ टक्के), कोलन (आतडे) (१६ टक्के), डोके व मान (१५ टक्के), रेक्टल (१३ टक्के), पित्ताशय (१३ टक्के) व स्तन (१० टक्के) याप्रमाणे कर्करोगाची शक्यता कमी झाली. अर्थात यात शरीराचे आकारमान व धूम्रपानाची सवय या घटकांचा विचार केलेला नाही. सर्व प्रकारच्या कर्करोगांची शक्यता शारीरिक व्यायामाने ७ टक्के कमी होते, असे संशोधकांनी म्हटले आहे. ‘जेएएमए’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Regular exercise will reduce the possibility of cancer
First published on: 18-05-2016 at 02:11 IST