नगर, नाशिक व औरंगाबाद या जिल्ह्यांतून तडीपार असलेल्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी गेलेल्या शिर्डी पोलिसांच्या पथकावर गुन्हेगारांच्या नातेवाइकांनी हल्ला केला. या झटापटीत दोन सराईत गुन्हेगार फरार होण्यात यशस्वी झाले. शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शिर्डीजवळील निमगांव हद्दीत ही घटना घडली.
दत्तात्रय बाबुराव कर्पे हा नाशिक, नगर व औरंगाबाद जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार आहे. त्याच्यावर दंगल, खून, मोक्का, चोरी असे आठ ते दहा गुन्हे दाखल आहे. दुसरा आरोपी गोिवद विनायक त्रिभुवन याच्यावर जबरी चोरी, घरफोडी याबरोबरच गावठी कट्टय़ाची तस्करी करणे अशाप्रकारचे पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत. कर्पे व त्रिभुवन हे दोघेही शिर्डीतील सराईत गुन्हेगार आहेत. हे दोघे शिर्डीजवळील निमगांव शिवारातील चारी क्र.११ येथे त्यांच्या घरी आल्याची माहिती शिर्डी पोलिसांना कळताच त्यांना पकडण्यासाठी शिर्डी पोलिसांचे पथक मध्यरात्री गेले असता या पथकावर गुन्हेगारांच्या नातेवाइकांनी दगडफेक केली. या प्रकारामुळे पोलीस चक्रावून गेले. या गडबडीत कर्पे व त्रिभुवन हे दोन आरोपी फरार झाले. पोलीस शिपाई बाळासाहेब कोळपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी आमीन अहमद शेख, मदिना हकीम शेख, मनीषा गोिवद त्रिभुवन, नंदा विनय त्रिभुवन, दत्तात्रय बाबुराव कर्पे व त्याची बायको, आरिफ नजीम शेख यांच्यासह तीन ते चार जणांविरुद्ध दंगल करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.
आमीन शेख व मदिना शेख या दोघांना पोलिसांनी अटक  केली. या दोघांना आज राहाता येथील न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.