वाई: सातारा जिल्हा परिषदेकडून डोंगरदऱ्यातील व दुर्गम भागातील नैसर्गिक स्रोत असणाऱ्या झऱ्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. डोंगराळ व दऱ्याखोऱ्यातील दुर्गम भागांत पाण्याची सहज उपलब्धता होऊ लागल्याने या झऱ्यांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. मात्र दुष्काळी परिस्थितीत आणि टंचाईच्या काळात या झाऱ्यांचे महत्त्व ओळखून प्रशासनाने झऱ्यांचे नवनिर्माण करून संवर्धन करण्याचे ठरविले आहे.

झऱ्यांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्यामुळे झरे आटले आहेत. त्यांचे पुनर्जीवन करून संवर्धन करण्यात येणार आहे. झरे हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत असून त्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. पूर्वी वर्षानुवर्षे दुर्गम डोंगराळ वाडी वस्तीतील लोकसंख्या, गुरे झऱ्यांच्या पाण्यावर अवलंबून असायची. वनस्पती आणि प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजातीदेखील झऱ्यांनीच टिकवून ठेवल्या. वाढते तापमान, पावसाचे कमी जास्त प्रमाण, पाण्याची टंचाई याचा खूप मोठा परिणाम झऱ्यांवर झाला नाही, त्यामुळे डोंगराळ भागात वस्ती व नैसर्गिक संपदा टिकवून ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. नैसर्गिक साखळी जिवंत ठेवण्याचे काम झऱ्यांनी केले. मात्र झऱ्यांचे अस्तित्व संपल्याने सातत्याने दुर्गम भागात पाणीटंचाई जाणवत असते. या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. कधीकधी टँकर वेळेत पोहोचत नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई सातत्याने जाणवत असते. यावर पर्याय म्हणून सातारा जिल्हा परिषदेने लोकसहभागातून झरे संवर्धनाचे काम सुरू केले आहे. दुर्गम भागातील १६३ झऱ्यांना यामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. या झऱ्यांना नवसंजीवनी देण्याचे काम सुरूही झाले आहे. यासाठी ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोगातून निधीही उपलब्ध करण्यात आला आहे.

हेही वाचा – आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांचे अखेर आदेश, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

झऱ्यांच्या स्रोतातील गाळ माती अडकल्याने नैसर्गिक प्रवाह कमी झाला आहे. अशा महाबळेश्वर, जावली, वाई, सातारा येथील डोंगराळ व दुर्गम भागातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हापरिषद ग्रामपंचायत विभागाने लोकसहभागातून झरे संवर्धनाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे ही कामे अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आली आहेत. या कामामुळे दुष्काळी भागात पुन्हा एकदा स्वच्छ व काही प्रमाणात मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.

डोंगराळ दुर्गम तालुक्यात प्रामुख्याने झरे संवर्धनाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी प्रवाह कमी असणाऱ्या झऱ्यांना वाट करून देत पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाह पुन्हा सुरू झाल्याने झऱ्यांमध्ये पाणी खळ खळू लागले आहे.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या, पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

झऱ्यांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्यामुळे झरे आटले आहेत. झऱ्यांच्या संवर्धनात स्प्रिंग बॉक्स बांधण्यात येत आहे. भूगर्भ रचना समजून झऱ्यांचा स्तोत्र शोधला जातो. पाण्याची नैसर्गिक स्वच्छता राखण्यासाठी फिल्टरचा वापर करण्यात येत आहे. झऱ्यांवरून पाणी घेण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करण्यात येत आहे, अशा पद्धतीने दुर्गम भागातील झऱ्यांचे संवर्धन केले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुर्गम भागात नैसर्गिक स्रोत असणाऱ्या झऱ्यांचे संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महाबळेश्वर, जावली, सातारा, वाई यासह इतर भागांतील नागरिकांना झऱ्याचे पाणी उपलब्ध होत आहे. झरे संवर्धनात स्प्रिंग ऑफ फिल्टर यासह इतर कामे झाल्याने पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे – अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद