नगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारासाठी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यादृष्टीने शहरात ठिकाणाचा शोध सुरू असून सावेडी भागातील मिस्कीन मळय़ात सभेची शक्यता व्यक्त होते.
गांधी यांची मोठी भिस्त मोदी यांच्यावरच आहे. त्यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा निश्चित झाल्याचे त्यांच्या गोटातून सांगण्यात येते. येत्या दि. १० ते ११ ला ही सभा होईल असा अंदाज असला तरी त्याची निश्चिती अद्यापि झालेली नाही. मात्र सभेची शक्यता गृहीत धरून पक्षाने शहरात जागेचा शोध सुरू केला आहे.
मोदींच्या देशातील सभा प्रचंड गर्दीच्या होत आहेत. विशेषत: शहरी भागात व तरुणांमध्ये त्यांचे आकर्षण असून अन्य ठिकाणचा अनुभव लक्षात घेऊन त्यानुसार नगरलाही ठिकाणाचा शोध सुरू आहे. पुणे रस्त्यावरील केडगाव येथील सहकारी औद्योगिक वसाहतीसमोरील मैदान, सावेडीतील संत निरंकारी बाबा मैदान आणि त्या जवळचाच मिस्कीन मळा अशा जागांची त्यादृष्टीने पाहणी करण्यात आली असून, त्यातील मिस्कीन मळय़ाला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पसंती दिल्याचे समजते. ही सुमारे सहा एकरांची मोकळी जागा आहे. मोदींच्या सभेला दीड ते दोन लाख लोक येतील अशी शक्यता गृहीत धरून जागेची चाचपणी सुरू आहे. मात्र पुण्यात मोदींची सभा झाली तर नगरला ती होण्याबाबत पक्षाच्याच गोटात साशंकताही व्यक्त होते. शेजारच्या दोन मतदारसंघांत दोन स्वतंत्र सभा मोदी घेत नाहीत असे कारण त्यासाठी सांगितले जाते. तीन ते चार मतदारसंघांसाठी त्यांची सभा होते, त्यामुळे पुण्यात सभा मिळाली तर नगरची शक्यता मावळेल असेही सांगण्यात येते.
गांधी यांच्या प्रचारासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी पहिल्याच टप्प्यात येऊन गेले आहेत. शेवगाव येथे त्यांची सभा झाली. पुढील आठवडय़ात अरुण जेटली येणार आहेत, मात्र त्यांची सभा ठेवण्याऐवजी डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकौंटंट, उद्योजक अशा गटांशी त्यांचा संवाद घडवून आणण्यात येणार आहे. याशिवाय अन्य काही राष्ट्रीय नेत्यांच्या सभा किंवा प्रचार दौऱ्याचे नियोजन पक्षातर्फे सुरू असल्याचे सांगण्यात येते.