सांगली : सांगली महापालिका क्षेत्रामध्ये रात्रीच्यावेळी चिते सोडण्याचा आणि मंगळ, चंद्र सफारीसाठी अंतराळ यान तळ उभारण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या महापालिकेच्या अभिरूप महासभेत घेण्यात आला. महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौरांच्या भूमिकेत आयुक्त सुनील पवार होते. महापालिकेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आज अभिरूप महासभेचे आयोजन वसंतदादा पाटील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी महापालिकेचे अधिकारी लोकप्रतिनिधींच्या तर पदाधिकारी प्रशासन अधिकार्यांच्या भूमिकेत होते.
मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्याच्या पहिल्याच ठरावावरून नगरसेवकांच्या भूमिकेत असलेल्या अधिकार्यांनी मागील इतिवृत्त वाचनाचा आग्रह धरला. मात्र, महापौरांना काही ऐनवेळचे विषय इतिवृत्तामध्ये घुसडायचे असल्याने इतिवृत्त लेखन झालेले नाही, असे सांगताच हशा पिकला. महापालिका क्षेत्रात आफ्रिकेतून चित्ते आणण्याचा विषय विषय पत्रिकेवर होता. यावेळी काही सदस्यांनी शहरातील भटके श्वान पकडून त्यांनाच चित्त्याची वस्त्रे परिधान करावीत आणि चिते, सांबर, गवा या वेषात सादर करावे, अशी सूचना मांडली. तर, काहींनी यासाठी निधीची काय व्यवस्था करण्यात आली आहे, असा सवाल केला. तर, बांधकाम विभागाकडून याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत असून ते कसे फुगावयाचे हे अधिकार्यांना ज्ञात असल्याची टिपणीही काहींनी केली.
हेही वाचा – धुळे : दोन चोरांकडून पाच मोटारसायकली जप्त
हेही वाचा – छत्तीसगढमधील चर्चवर हल्ल्यांच्या निषेधार्थ धुळ्यात मूक मोर्चा
दरम्यान, याबाबत महापौरांनी सांगलीसाठी दोन, मिरजेसाठी तीन तर कुपवाडसाठी एक असे सहा चित्ते प्रायोगिक तत्वावर सोडण्यात येतील आणि यावर देखरेख करण्यासाठी तीन महिला व चार पुरुष अशी सात सदस्यांची समिती नियुक्त करण्यात येईल, अशी घोषणा केली. यापूर्वी २०१८ मध्ये सांगलीत समुद्र आणण्याचा ठराव करण्यात आला होता, त्याचे काय झाले? अशी विचारणा यावेळी करण्यात आली. तर, मंगळ व चंद्र पर्यटनासाठी अंतराळ यान स्थानक उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे अंतराळ स्थानक कुपवाडमध्येच करण्यात यावे, अशी आग्रही मागणी कुपवाडच्या सभेत करण्यात आली. मात्र, महापौरांनी हे अंतराळ यान स्थानक आयुक्त निवास येथे उभारण्यात येईल, अशी घोषणा केली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये नगरसेवकांच्या भूमिकेत असलेले उपायुक्त राहूल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील यांनी सहभाग घेतला, तर प्रशासनाच्या भूमिकेत महापौर दिग्विजय सुर्यवंशी, विष्णू माने, जगन्नाथ ठोकळे, अविनाश भोसले यांनी सहभाग घेतला. अनेक विषयांवर यावेळी वादळी पण हास्यविनोदात चर्चा रंगली.