नवनिर्वाचित महापौर रोहिणी शेंडगे यांचे आश्वासन

नगर : शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करू, असे शिवसेनेच्या नवनिर्वाचित महापौर रोहिणी संजय शेंडगे यांनी तर महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावून शहराचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित उपमहापौर गणेश पुंडलिक भोसले यांनी आज, बुधवारी निवडीनंतर बोलताना सांगितले.

महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे व उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता आज पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आयोजित केलेल्या मनपा महासभेत पूर्ण करण्यात आली. दोघांचे आपापल्या पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याचे कालच, मंगळवारी स्पष्ट झाले होते. त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे आजच्या ऑनलाइन पद्धतीने झालेल्या सभेत जाहीर करण्यात आले. शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये काल, मंगळवारी रात्री शहरातील एका हॉटेलच्या आवारात मोठा राडा झाल्याने निवड सभेच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त मनपा कार्यालयाच्या आवारात तैनात करण्यात आला होता

निवडीनंतर जिल्हाधिकारी भोसले यांनी दोघांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आयुक्त शंकर गोरे, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नगरसचिव एस. बी. तडवी आदी यावेळी उपस्थित होते. ऑनलाइन सभेमुळे प्रत्यक्ष सभागृहात केवळ श्रीमती शेंडगे व भोसले हे दोघेच उपस्थित होते. निवडीनंतर शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांंनी गुलाल उधळत व फटाके फोडत जल्लोष केला.

निवडीनंतर बोलताना श्रीमती शेंडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप तसेच नगरसेवकांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला तो आपण सार्थ करू असे सांगत त्यांचे आभार मानले. उपमहापौर भोसले यांनी यंदाची बिनविरोध निवड ही न भूतो न भविष्यती असल्याचा उल्लेख केला. निवडीबद्दल त्यांनी आ. अरुण जगताप व आ. संग्राम जगताप यांचे आभार मानले. आपण नगरकरांना फार मोठे स्वप्न दाखवणार नाही, परंतु हरित नगर ही आपली संकल्पना आहे. अमृत पाणी योजना मार्गी लावू तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावून प्रलंबित प्रश्न सोडवू असे त्यांनी सांगितले.