संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा दिवसेंदिवस वाढत आहे. पालखी सोहळा हा आनंद सोहळा व्हावा, यासाठी नियमात न चालणाऱ्या दिंडय़ांवर बंधने आणणार असल्याचा निर्णय वारकरी फडकरी समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. माउलींचे चोपदार राजाभाऊ रंधवे यांनी ही माहिती दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळय़ात फलटण येथील दोन दिवसांच्या मुक्कामात दिंडीप्रमुखांची बैठक दिंडीचे मालक बाळासाहेब पवार-आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी दिंडी समाजाचे अध्यक्ष भानुदासमहाराज ढवळीकर, सचिव मारुती कोकाटे, सोहळाप्रमुख डॉ. प्रशांत सुरू, वारकरी फडकरी दिंडी समाजाचे अध्यक्ष माउली जळगावकर व दिंडीप्रमुख उपस्थित होते.
राजाभाऊ चोपदार म्हणाले, माउलींचा सोहळा दिवसेंदिवस वाढत आहे. दिंडीप्रमुखांनी आत्मपरीक्षण करावे, सोहळय़ात आमदारांनी पास मागितला तरी दिला जात नाही, पासमुळे सुविधा वाढल्या तरी दिंडीप्रमुखाने त्याचा गैरवापर न करता दिंडीबाहय़ लोकांना त्याचा वापर करू देऊ नये. सध्या सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यादृष्टीने योग्य पावले उचलावी लागणार आहेत. त्यासाठी दिंडीप्रमुखांच्या सहकार्याची गरज आहे. नियमात न चालणाऱ्या दिंडय़ांना पालखी सोहळय़ापुढे चालू दिले जाणार नाही. पालखी तळावर मुक्कामास परवानगी दिली जाणार नाही. अनधिकृत दिंडय़ांनी माउलींच्या मागे एक मुक्काम चालावे. त्यामागील दिंडय़ांनी जेथे माउलींचा सकाळचा विसावा आहे तेथे दुपारचे जेवण घ्यावे. जेथे सायंकाळचा विसावा आहे तेथे रात्रीचा मुक्काम करावा. माउलींच्या रथापुढील २७ व रथामागील १०० दिंडय़ांनीच सोहळय़ाबरोबर चालावे. माउलींच्या पालखी सोहळय़ात फक्त माउलींचे अधिष्ठान राहील. इतर पादुकांना रथावर नेण्याची परवानगी दिली जाणार नाही. ते रथ जप्त करून घेतले जातील. पालखीतळावरील ध्वनिक्षेपकाखेरीज इतर दिंडय़ांमध्ये त्याचा वापर करू दिला जाणार नाही. असा वापर केल्यास साहित्य जप्त करण्याचा इशारा राजाभाऊ चोपदार यांनी दिला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jul 2013 रोजी प्रकाशित
पालखीतील दिंडय़ांवर बंधने येणार
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा दिवसेंदिवस वाढत आहे. पालखी सोहळा हा आनंद सोहळा व्हावा, यासाठी नियमात न चालणाऱ्या दिंडय़ांवर बंधने आणणार असल्याचा निर्णय वारकरी फडकरी समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

First published on: 13-07-2013 at 05:48 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restrictions will be imposed on dindi of palkhies