अहिल्यानगर: राहुरीतील मनमाड रस्त्यावर आज शुक्रवारी पुन्हा एकदा झालेल्या अपघातात सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा बळी गेला. त्यामुळे संतप्त झालेल्या राहुरीकरांनी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तीन तास आंदोलन चालल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर राहुरी तालुक्याच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांत ४०० अपघात झाले. त्यात ३०० जणांचा मृत्यू झाला. गेल्या १२ दिवसांत ७ जणांचा अपघातात बळी गेला. अपघाताची मालिका सुरूच आहे. गेंड्याची कातडे पांघरलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय ते वठणीवर येणार नाहीत, असा हल्लाबोल माजी आमदार तनपुरे यांनी केला.
आज सकाळी राहुरी येथील सेवानिवृत्त अधिकारी शशिकांत दुधाडे यांचा डिग्रस फाट्याजवळ अपघात झाला व ते मृत्युमुखी पडले. ही माहिती राहुरीत पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुधाडे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून रस्त्यावर आणण्यात आला व रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधीक्षक जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याच आंदोलनादरम्यान देहरे येथेही अपघातात आणखी एकाच बळी गेला. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी वक्त्यांनी संतप्त भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले, नव्याने नेमण्यात आलेल्या ठेकेदाराबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही. त्यांनी अजून काम सुरू केले नाही. त्याला आम्ही सहकार्य करू. परंतु, पूर्वीच्या ठेकेदाराने व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. थातूरमातूर कामे करून ठेकेदार पळून गेले. याला जबाबदार कोण? कमी दराने निविदा स्वीकारून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली. यावेळी हर्ष तनपुरे, संतोष शेळके, कांता तनपुरे, रवी मोरे, विक्रम गाडे, नीलेश जगधने, ज्ञानेश्वर जगदाळे आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
राहुरी कारखाना येथे रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या ९ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, ते मागे घ्यावे, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी नगर-मनमाड रस्त्यावरील अवजड वाहतूक राहुरी बाहेरून वळवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आंदोलनामुळे दोन्ही बाजूने सहा ते सात किमी लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.