revenue minister radhakrishna vikhe make allegation on maha vikas aghadi zws 70 | Loksatta

महाविकास आघाडीने केवळ ‘वसुली सरकार’ म्हणून काम केले ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा आरोप

नगर जिल्ह्यात तीन मंत्री होते मात्र कोणताही विकास झाला नाही, अशी टीकाही मंत्री विखे यांनी केली.

महाविकास आघाडीने केवळ ‘वसुली सरकार’ म्हणून काम केले ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा आरोप
राहुरी येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे भाषण झाले.

नगर : मागील महाविकास आघाडी सरकारने अंधाधुंद कारभार करून राज्याला २५ वर्षे मागे नेण्याचे काम केले. केवळ वसुली सरकार म्हणून कार्यरत होते, असा आरोप महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज, रविवारी राहुरीत बोलताना केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवाजी कर्डिले होते. या वेळी विखे यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. बिघाडी व वसुली सरकारने राज्याला अक्षरश: लुटले. केवळ सत्ता व त्यातून पैसा असे धोरण राबवले. राष्ट्रवादी व काँग्रेसला कोणताही जनाधार नव्हता. शिवसेनेच्या मदतीने राज्यात अडीच वर्ष सत्ता राबवताना ‘वसुली’चा कार्यक्रम केला. नगर जिल्ह्यात तीन मंत्री होते मात्र कोणताही विकास झाला नाही, अशी टीकाही मंत्री विखे यांनी केली.

 ‘बिघाडी सरकार’मधील अनेक मंत्री जेलमध्ये गेले. आज ते आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. राज्यात लम्पी आजाराने थैमान घातले असून आजार आटोक्यात आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात लसीकरणाची मोहीम हाती घेतल्याने हजारो जनावरे वाचल्याचा दावा करून मंत्री विखे यांनी केला. 

हेही वाचा >>> राज ठाकरे सगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ कलाकार – नितीन गडकरींकडून जाहीर स्तुती

माजी आमदार कर्डिले, माजी सभापती सुभाष पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, रावसाहेब तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम यांची भाषणे झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ यांच्यासह अनेकांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.  

निळवंडेचे पाणी मार्चपर्यंत शेतात

येत्या मार्चपर्यंत निळवंडे धरणाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री विखे यांनी केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील नॅशनल डेअरीह्णला सुमारे १०० एकर जमीन मी कृषिमंत्री असताना दिली. राहुरीतील ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. विद्यापीठातील उर्वरित प्रकल्पग्रस्तांनाही न्याय दिला जाईल, ओढय़ानाल्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी मोहीम करावी, जमिनीच्या मोजणीचे काम त्वरित होण्यासाठी ठोस धोरण हाती घेतले जाईल, असे सांगत त्यांनी सुरत-हैदराबाद महामार्गाच्या संपादित जमिनींना योग्य मोबदला मिळण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

हेही वाचा >>> “नितीन गडकरी जे काही करतात ते ‘वरून’च करतात, आमचं जुळतं कारण…”; राज ठाकरेंचं नागपुरात विधान!

शिवाजी कर्डिले आमदार होतील 

खासदार डॉ. विखे म्हणाले, राहुरीचे राजकारण कोणालाही समजत नाही. मात्र आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले आमदार होतील. अधिकाऱ्यांनी यापुढे  वाडय़ाह्णवर जाऊन काम करता येणार नाही. केंद्र शासनाच्या योजनांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न माजी मंत्र्यांनी केला. मंत्रिपद आल्याने आता गर्दी वाढली आहे. मात्र निष्ठा ठेवावी. राहुरीत स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतीत सर्वपक्षीय राजकारण चालते. आता यापुढे केवळ भाजपच्या चिन्हावरच निवडणुका होतील असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2022 at 02:06 IST
Next Story
काळय़ा बाजारात विक्रीसाठी जाणारा १८५ क्विंटल तांदूळ जप्त