नगरःनगर मतदारसंघातून मी निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नये म्हणून सध्याच्या महसूल मंत्र्यांनी माझ्याकडे मुंबईतील उद्योगपतीला पाठवून, निलेश लंके सोडून दुसरा उमेदवार द्या, अशी विनंती केली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज, शुक्रवारी रात्री नगरमधील जाहीर सभेत बोलताना केला. निलेश लंके यांच्या उमेदवारीमुळे महसूल मंत्र्यांची झोप उडाली म्हणूनच त्यांनीही विनंती केली, असा दावाही पवार यांनी केला. 

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आज नगर शहरातील गांधी मैदानात जाहीर सभा व लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सांगता सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार यांनी हा गौप्यस्फोट केला. यावेळी विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, अंकुश काकडे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा >>> साताऱ्यात उदयनराजे, शशिकांत शिंदेसह ३३ उमेदवारी अर्ज दाखल

नगर मतदारसंघातून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव महायुतीकडून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांचे विरोधी उमेदवार महाविकास आघाडीचे निलेश लंके आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केलेला दावा खळबळजनक ठरत आहे. शरद पवार म्हणाले की, मी त्या उद्योगपतीला विचारले तुमचा आणि विखेंचा संबंध काय तर त्या उद्योगपतीने मला असे संबंध ठेवावेच लागतात, असे उत्तर दिले. विखे यांच्याकडे सत्ता, साधन संपत्ती आहे. परंतु निलेश लंके यांच्यासारखे सर्वसामान्यांचे प्रेम आणि माणुसकी नाही.

हेही वाचा >>> मोदी कंपनीला घालवण्याची सुरुवात सांगलीतून – खा. राऊत

काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार व बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्याचा समाचार घेताना शरद पवार म्हणाले की, त्यांच्याकडे माणुसकी शिल्लक नसल्यामुळेच ते वारंवार आमच्यावर टीकाटिपणी करतात. खरेतर सार्वजनिक जीवनात माझी व थोरात यांची त्यांना मदतच झाली आहे. बाळासाहेब विखे यांना जेव्हा खासदार व्हायचे होते, त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. परंतु त्यांना भाऊसाहेब थोरात यांच्या विरोधाची भीती वाटत होती. त्यामुळे ते माझ्याकडे आले, मी रात्री एकपर्यंत कामात व्यस्त होतो. त्यानंतर हा प्रश्न माझ्यासमोर आला. मी बाळासाहेब विखे यांना गाडीत घेतले व थोरात यांच्या जोर्वे गावी गेलो. पहाटे ३ वाजता भाऊसाहेब थोरात यांना झोपेतून उठवले. थोरात यांनी विखे यांना माफ केले. झाले गेले विसरून आम्ही तुम्हाला मदत करू असे सांगितले. त्यामुळे बाळासाहेब विखे यांचा लोकसभेचा रस्ता खुला झाला. परंतु माणुसकी नसल्यामुळेच ते आमच्यावर टीकाटिपणी करत आहेत.  पूर्वी विखे शिवसेनेत गेले, पुन्हा काँग्रेसमध्ये आले. विरोधी पक्षनेते झाले पुन्हा भाजपत गेले. अशी व्यक्ती आमच्यावर टीकाटीपणी करत आहेत याचे कारण म्हणजे त्यांना निवडणुकीत निवडून येण्याचा आत्मविश्वास नाही, असाही आरोप प शरद पवार यांनी केला.

Story img Loader