दुष्काळग्रस्त भागातील पशुधन वाचविण्यासाठी धनवान मंडळींनी खासगी स्वरूपात चारा छावण्या सुरू करण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीतर्फे करण्यात आले असून ‘सुग्रासदान चळवळ’ उभी करण्याचा निर्णयही कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. बागाईतदारांनी त्यांच्या क्षेत्रात काही प्रमाणात चारा पिकवून तो दुष्काळग्रस्त भागात मोफत वाटावा, दानशूरांनी जनावरे दत्तक घ्यावी, याशिवाय पशुधन जगविण्यासाठी सर्वानी शक्य होईल ती मदत करण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले. पुढील शैक्षणिक वर्षांकरिता दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करावी, चारा छावण्या सुरू नसलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना चारा अनुदान द्यावे, कोणत्याही प्रकारच्या कर्जवसुलीस सहा महिन्यांसाठी बंदी आणावी, वाहन सव्र्हिस सेंटरवाल्यांनी पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याचा वापर करावा अन्यथा ‘वॉशिंग सेंटर’ बंद करण्यात येईल, मोफत चारा छावण्या सुरू करणाऱ्यांना प्राप्तिकरात सवलत द्यावी, सरकारी कर्मचाऱ्यांचा पुढील सहा महिने एका दिवसाचा पगार दुष्काळग्रस्त साहाय्यता निधीसाठी देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले. या मागण्यांवर १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. या बैठकीस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष छबू नागरे, जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, किरण देशमुख, उदय सांगळे, अभिजित कासार आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2013 रोजी प्रकाशित
धनवानांनी चारा छावण्या सुरू कराव्यात;
दुष्काळग्रस्त भागातील पशुधन वाचविण्यासाठी धनवान मंडळींनी खासगी स्वरूपात चारा छावण्या सुरू करण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीतर्फे करण्यात आले असून ‘सुग्रासदान चळवळ’ उभी करण्याचा निर्णयही कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
First published on: 25-02-2013 at 03:14 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rich people should start fodder camp