NCP Leader Eknath Khadse Son-in-Law Arrested: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अटकेचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. राजकीय वर्तुळातून त्यावर प्रतिक्रिया उमटत असून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप प्रांजल खेवलकर यांच्यावर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी पतीची पाठराखण केली आहे. त्यामुळे आता पोलीस तपासातून नेमकं काय समोर येणार? याबाबत तर्क लावले जात आहेत.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
रोहिणी खडसेंनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पतीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी लवकरच सत्य बाहेर येईल अशा आशयाची पोस्ट केली आहे. “कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल! जय महाराष्ट्र”, असं या पोस्टमध्ये रोहिणी खडसेंनी म्हटलं आहे.
काय आहे रेव्ह पार्टी प्रकरण?
पुण्याजवळच्या खराडी भागात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. एका गृहनिर्माण संकुलात शनिवारी मध्यरात्री ही पार्टी चालू होती. स्वत: प्रांजल खेवलकरही या पार्टीमध्ये उपस्थित होते. पोलिसांना या रेव्ह पार्टीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी छापा टाकला. तिथे दारूसह गांजा व हुक्का मोठ्या प्रमाणावर आढळून आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करून पाच पुरुष व दोन महिलांना ताब्यात घेतलं. खेवलकर हे एकनाथ खडसेंचे जावई असल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.
एकनाथ खडसेंची जावयाच्या अटकेवर प्रतिक्रिया
दरम्यान, एकनाथ खडसेंना प्रांजल खेवलकर यांच्या अटकेबाबत विचारणा केली असता त्यांनी पोलीस तपासाचा उल्लेख केला. “पुण्यातील पार्टी ही रेव्ह पार्टी होती की घरगुती स्वरूपाची, हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल”, असं ते म्हणाले. “पार्टीदरम्यान खरोखर अंमली पदार्थांचा वापर झाला होता की नाही, याची खात्री न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच होईल. त्यामुळे तोपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे किंवा भाष्य करणे योग्य ठरणार नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
गिरीश महाजन यांचा खडसेंना टोला
दरम्यान, जावई प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर भाजपा नेते व एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला आहे. आपल्या कुटुंबावर अशा प्रकारची कारवाई केली जाऊ शकते, याची शक्यता वाटत होती, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिल्याबाबत विचारणा केली असता महाजन म्हणाले, “जर खडसेंना ट्रॅप लावला जाणार आहे, याची कल्पना होती तर त्यांनी जावईबापूंना अलर्ट करायला हवे होते!”