Rohit Pawar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान आग्रा येथून महाराजांनी सुटका करून घेतल्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी केलेला दावा गेल्या काही दिवासांपूर्वी चांगलाच चर्चेत आला आहे. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला होता. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी टीका केली आहे.

काय म्हटलं आहे रोहीत पवार यांनी?

अडगळीत पडलेल्या एका अभिनेत्याने चर्चेत येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्लाघ्य विधान केलं नाही ना? तसं नसेल तर या विधानामागील हेतू आणि सडका मेंदू कुणाचा आहे हे शोधणं गरजेचं आहे. काही वेडपट माणसं छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील महान व्यक्तिमत्त्वांविषयी चुकीची विधानं कुणाच्या आशीर्वादाने करतात? महापुरुष हे केवळ महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी नाही तर सर्वांसाठीच पूजनीय आहेत, त्यामुळं त्यांच्याविषयी वादग्रस्त विधानं करणं थांबवलं पाहिजे, अन्यथा अशा महाभागांना मराठी माणूस जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा रोहीत पवार यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल सोलापूरकर यांचं वक्तव्य काय?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण कळावं म्हणून हिरकणीची कथा रचली गेली आहे. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगत. हिरकणी घडलेलीच नाही. असं काहीही नाही. असा इतिहासच नाही. पण लिहिलं गेलं. महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आले आहेत महाराज, त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत. औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली आहे. मौसिन खान किंवा मौईन खान नाव आहे त्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले आहेत. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही आहे अजूनही. गोष्टी रुपात करताना ते रंजक करुन सांगितलं गेलं आहे. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही. असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलं आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. ज्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे.