Rohit Pawar On Ajit Pawar and Sharad Pawar NCP : महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा रंगताना पाहायला मिळतात. या चर्चांचं कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून करण्यात येणारे सूचक विधाने. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याबाबत तर्कवितर्क लावले जातात. तसेच या चर्चांमागचं आणखी एक कारण म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे अनेकदा एका व्यासपीठावर आल्याचंही पाहायला मिळालं होतं. एवढंच नाही तर दोघांमध्ये अनेकदा संवादही झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यासंदर्भात काही नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जातात.

दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात मोठं भाष्य केलं आहे. ‘अजित पवार यांनी भाजपाची साथ सोडली तर आम्ही एकत्र येण्याचा विचार करू’, असं रोहित पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? किंवा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र यावं का? काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला असता रोहित पवार यांनी म्हटलं की, “मी तुम्हाला सध्या एकच सांगतो की आम्ही भाजपाच्या विरोधात आहोत. भाजपाच्या विचारसरणीच्या विरोधात आहोत. त्यामुळे उद्या भविष्यात अजित पवार यांनी भाजपाची साथ सोडली आणि अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबरोबर, पुरोगामी विचाराबरोबर राहण्याचा विचार केला तर त्यावेळेस आम्ही विचार करू. मात्र, ते जर भाजपाबरोबर असतील तर आम्ही एकत्र येऊ शकत नाहीत. पण त्यांनी (अजित पवार) भाजपाला सोडलं तर आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण काय करायचं? हा निर्णय घेतला जाईल”, असं मोठं विधान रोहित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान केल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. मात्र, अजित पवार यांनी भाजपाची साथ सोडली तर आम्ही एकत्र येण्याचा विचार करू, असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांना एक प्रकारे भाजपाची साथ सोडण्याची अटच ठेवली आहे.