कर्जत: आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गटरचना करताना विशिष्ट गटात, सोयीच्या विशिष्ट गावांचा समावेश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा आदेश न जुमानल्यानेच जामखेड तहसीलदारांची गडचिरोलीला बदली करण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांची धानोरा (जि. गडचिरोली) येथे अवघ्या एका वर्षात बदली करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पवार यांनी हा आरोप केला आहे. पवार यांचा रोख विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे आहे.
नियमात नसलेल्या कामांसाठीही अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो. नियमबाह्य आदेशाचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्याची दुर्गम भागात बदली केली जाते. वास्तविक प्रामाणिक अधिकारी असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणाची शिक्षा मिळत असेल तर त्यांच्याकडून चांगल्या कामाची कशी अपेक्षा करता येईल? सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या धुंदीतून बाहेर यावं अन्यथा आगामी निवडणुकीत जनता त्यांची धुंदी उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशीही टीका पवार यांनी केली आहे.