Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांच्यावर पोलिसांवर ओरडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांच्याविरोधात मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिसांनी तशी फिर्यादच घेतली आहे. हा गुन्हा नोंद होण्यामागे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आणि आमदार नितीन देशमुख यांच्या अटकेची पार्श्वभूमी आहे. दोन दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या लॉबीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेतलं होतं. नितीन देशमुख यांच्या अटकेविरोधात रोहित पवार हे थेट पोलीस ठाण्यात गेले होते आणि तिथे त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी वाद घातला. आता या प्रकरणी रोहित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

विधिमंडळात झालेल्या गोंधळानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे पोलीस ठाण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्याची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, तो कार्यकर्ता सदरील पोलीस ठाण्यामध्ये नसल्याचं पोलिसांनी या दोघांनाही सांगितलं. यावेळी रोहित पवार आणि पोलिसांमध्ये चांगलाच वाद जुंपला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित पवार यांचा दमदाटी करतानाचा व्हिडीओ व्हायरल

पोलिसांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ व्हायरल : “शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, आवाज खाली, हातवारे करुन आमदारासोबत बोलायचं नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं. तर आमदार रोहित पवार यांचा पोलिसांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबरोबरच त्यांचे कार्यकर्ते देखील यावेळी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. आता याच प्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.